राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी दिली शपथ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाच्या चौदाव्या उपराष्ट्रपतिपदी जगदीप धनखड विराजमान झाले आहेत. राष्ट्रपती भवनात गुरुवारी त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य मंत्री उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धनखड यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ बुधवारी संपला आहे.
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांचा पराभव करत रालोआचे उमेदवार जगदीप धनखड यांनी विजय संपादन केला होता. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत 780 पैकी 725 खासदारांनी मतदान केले होते. संसदेच्या दोन्ही सभागृहांची मिळून एकूण सदस्यसंख्या 788 आहे. त्यापैकी वरिष्ठ सभागृहातील आठ जागा सध्या रिक्त आहेत. अशा स्थितीत उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत 780 खासदार मतदानासाठी पात्र ठरले होते. या खासदारांचे मतदान पार पडून हा निकाल जाहीर झाला होता. धनखड यांना 528, तर अल्वा यांना 182 मते मिळाली होती. त्याचवेळी 15 मते रद्द करण्यात आली होती. उपराष्ट्रपतिपदासाठी 92.94 टक्के मतदान झाले होते.
कायदा विषयाचे अभ्यासक असलेल्या जगदीप धनखड यांची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द विशेष अशी आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या धनखड यांनी चित्तौडगड येथील सैनिक स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. भौतिकशास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजस्थान विद्यापीठातून एलएलबी केले. धनखड हे क्रीडाप्रेमी म्हणूनही ओळखले जातात. राजकीय पटलावर 1989 च्या लोकसभा निवडणुकीत ते झुंझुनू येथून खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी 1990 मध्ये संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. व्ही. पी. सिंग आणि चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. 1991 मध्ये धनखड यांनी जनता दल सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1993 मध्ये ते अजमेरमधील किशनगडमधून आमदार झाले. यानंतर 2003 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. धनखड यांची जुलै 2019 मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांनी देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतल्यानंतर सर्वसामान्य व्यक्ती मोठय़ा पदावर विराजमान झाली आहे.