ऑनलाईन टीम/तरुण भारत
यंदा मुंबईत प्रथमच शिवसेनेचे दोन मेळावे झाले. एक परंपरेनुसार उद्धव ठाकरे यांचा तर शिवसेनेत बंड केलेले आणि राज्याचे मुख्यमंत्री मेळाव्याला यांचा. मात्र उद्धव ठाकरेंचे बंधू जयदेव ठाकरे (Jaidev Thackeray) यंदा एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बीकेसी मेळाव्यात दिसून आले. ठाकरे घराण्यातील असूनही जयदेव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पाठींबा दिल्याने खरं तर याची जोरदार चर्चा रंगलीय. पण आज आणखी एका ठाकरेंच्या निर्णयाने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्यात. जयदेव ठाकरेंचेच पुत्र जयदीप ठाकरे (Jaydeep Thackeray) यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे जाहीर केले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीच्या मैदानात घेतलेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ज्येष्ठ बंधू जयदेव ठाकरे (Jaidev Thackeray) यांनी हजेरी लावली होती. याशिवाय जयदेव यांच्या घटस्फोटित (दुसऱ्या) पत्नी स्मिता ठाकरे, बिंदूमाधव ठाकरेंचे सुपुत्र निहार ठाकरे यांनीही एकनाथ शिंदेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मात्र जयदेव आणि त्यांची पहिली पत्नी जयश्री यांचे सुपुत्र, म्हणजेच बाळासाहेबांचे सर्वात मोठे नातू जयदीप ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या मैदानावर झालेल्या उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली होती. आपण ठाकरेंसोबत असल्याचं जयदीप यांनी सांगितलं आहे.
वडिलांविरोधात मुलाने अशी भूमिका घेतल्याने शिवसेनेतील विशेषतः ठाकरे घराण्यातील मतभेद आणखी अधोरेखित झालेत. जयदेव ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे थोरले बंधू आहेत. तर जयदीप ठाकरे हे जयदेव ठाकरेंचे पुत्र असून सध्या ते परस्परांसोबत राहात नाहीत. जयदीप ठाकरे हे वांद्रे येथील मोठ्या कंपनीचे क्रिएटिव्ह हेड आहेत.