वृत्तसंस्था/ हैदराबाद
नवव्या प्रो कबड्डी लिग स्पर्धेत शनिवारी झालेल्या विविध सामन्यांत जयपूर पिंक पँथर्सने युपी योद्धासचा, तेलगू टायटन्सने यु मुम्बाचा तर दबंग दिल्लीने पाटणा पायरेटसचा पराभव करत आपले विजय नोंदवले.
जयपूर पिंक पँथर्सने युपी योद्धास संघाचा 42-29 अशा 13 गुणांच्या फरकाने पराभव केला. जयपूर संघातील अर्जुन देसवालचा खेळ दर्जेदार झाला. त्याने या सामन्यात 19 गुण नोंदवत सामनावीराचा बहुमान पटकाविला. या सामन्यात देसवाल आणि राहुल चौधरी यांनी सुरुवातीपासूनच आपल्या संघाला गुण मिळवून दिले. जयपूर पिंक पँथर्सने दहाव्या मिनिटाला 13-3 अशी आघाडी मिळवली होती. 17 व्या मिनिटाला जयपूर पिंक पँथर्सने ही आघाडी 18-8 अशी वाढवली. सामन्याच्या मध्यंतराला जयपूर पिंक पँथर्सने 22-10 अशी 12 गुणांची भक्कम बढत घेतली होती. युपी योद्धास संघातर्फे जेम्स कामवेटीने एकाकी लढत देत जयपूर पिंक पँथर्सची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. नरवालच्या चढाईवर युपी योद्धासचे सर्व गडी बाद झाले. अखेर जयपूर पिंक पँथर्सने हा सामना 42-29 अशा गुण फरकाने आरामात जिंकला.
या स्पर्धेतील शनिवारी झालेल्या दुसऱया सामन्यात तेलगू टायटन्सने यु मुम्बाचा 32-26 अशा सहा गुणांच्या फरकाने पराभव करून गेल्या 12 सामन्यातील आपली पराभवाची मालिका खंडित केली. तेलगू टायटन्सच्या सिद्धार्थ देसाईने 9 गुण मिळवले. सामन्याच्या सुरुवातीला गुमान सिंग, किरण मगर यांच्या चढाईवर यु मुम्बा संघाने मध्यंतरावेळी 15-14 अशी केवळ एक गुणाची आघाडी मिळवली होती. त्यानंतर तेलगू टायटन्सच्या अभिषेक सिंगने यु मुम्बाचे बरेच गडी बाद करून सामन्याला कलाटणी दिली. तेलगू टायटन्सने यु मुम्बाचे सर्व गडी बाद करून तीन गुणांची आघाडी शेवटच्या दहा मिनिटांच्या कालावधीत मिळवली होती. शेवटच्या दोन मिनिटामध्ये परवेश आणि विशाल भारद्वाज यांनी तेलगू टायटन्सला महत्त्वाचे गुण मिळवून देत यु मुम्बाचे आव्हान सहा गुणांच्या फरकाने संपुष्टात आणले.
शनिवारच्या तिसऱया सामन्यामध्ये विशाल आणि अमित हुडा यांच्या दर्जेदार खेळाच्या जोरावर दबंग दिल्ली संघाने पाटणा पायरेटसचा 30-27 अशा तीन गुणांच्या फरकाने पराभव केला. दबंग दिल्लीला या सामन्यात विजयाची नितांत गरज होती. दिल्लीच्या विशाल आणि अमित हुडा यांनी आपल्या चढायावर प्रत्येकी पाच गुण मिळवले. पाटणा पायरेटस्च्या मोहमदेझा चियानाने आपल्या चढाईवर 16 गुण मिळवले. या स्पर्धेच्या इतिहासातील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. सातव्या मिनिटाला दबंग दिल्लीने पाटणा पायरेटसवर 9-3 अशी आघाडी मिळवली होती. 16 व्या मिनिटाला पाटणा पायरेटसने दबंग दिल्लीवर 12-10 अशी दोन गुणांची आघाडी घेतली होती. मध्यंतरावेळी दबंग दिल्लीने 14-12 अशी दोन गुणांची बढत मिळवली होती. सामन्याच्या उत्तरार्धात दबंग दिल्लीच्या बचावफळीची कामगिरी दर्जेदार झाली. या कामगिरीमुळे 37 व्या मिनिटाला दबंग दिल्लीने पाटणा पायरेटसवर 27-23 अशी आघाडी मिळवली होती. अखेर दबंग दिल्लीने हा सामना तीन गुणांच्या फरकाने जिंकून पाटणा पायरेटसचे आव्हान समाप्त केले.