उत्तराखंडमध्ये अंकितावर अंत्यसंस्कार ः सरकारच्या प्रतिनिधींशी कुटुंबीयांची चर्चा
वृत्तसंस्था / श्रीनगर
उत्तराखंडच्या श्रीनगरमध्ये साडेआठ तास चाललेल्या निदर्शनानंतर रविवारी अंकिता भंडारीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तत्पूर्वी तिच्या कुटुंबाने विस्तृत शवविच्छेदन अहवाल जाहीर करण्याची मागणी करत अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता. अखेर प्रशासनाने समजूत काढल्यावर कुटुंबाने अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शविली होती. अंकिता हत्याप्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालविण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून लोक हातात अंकिताचा फोटो घेऊन ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर निदर्शने करत होते. मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यात येत असताना निदर्शकांनी रुग्णवाहिका रोखण्याचा प्रयत्न केला. अशा स्थितीत अंकिताच्या वडिलांनी केलेल्या भावुक आवाहनानंतर जमावाने मार्ग मोकळा करून दिला. अलकनंदा नदीच्या काठावरील घाटावर अंकितावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
शवविच्छेदन अहवालानुसार अंकिताचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाला आहे. कालव्यात ढकलण्यापूर्वी तिला एखाद्या अवजड वस्तूने मारहाण करण्यात आली होती. तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. शवविच्छेदन अहवालात लैंगिक शोषण किंवा बलात्काराचा उल्लेख नाही. या हत्या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केली आहे.
ज्या रिसॉर्टमध्ये गुन्हय़ाचे पुरावे होते, तो रिसॉर्ट प्रशासनाने बुलडोझरने जमीनदोस्त का केला अशी विचारणा करत अंकिताचे वडिल वीरेंद्र भंडारी यांनी पुरावे मिटविण्यात आल्याचा आरोप केला आहे. रिसॉर्टवर बुलडोझर चालविण्याचा आदेश कुणी दिला याची चौकशी केली जात असल्याचे जिल्हाधिकारी विवेक जोगदंडे यांनी सांगितले आहे.
रिसॉर्टच्या कर्मचाऱयांची चौकशी
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अंकिता हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचा आदेश दिला होता. या एसआयटीचे प्रमुख म्हणून पोलीस महासंचालक पी. रेणुका देवी जबाबदारी सांभाळत आहेत. आरोपी पुलकित आर्य याच्या रिसॉर्टमध्ये काम करणाऱया सर्व लोकांची कसून चौकशी केली जात आहे. पुलकितच्या रिसॉर्टला परवाना कसा मिळाला याचीही चौकशी होत आहे. अंकिताच्या व्हॉट्सऍप चॅटचा देखील तपास केला जात असल्याचे एसआयटी प्रमुखांनी सांगितले आहे.
माजी मंत्र्याच्या मुलाला अटक
अंकिताच्या हत्येचा आरोप राज्याचे माजी मंत्री विनोद आर्य यांचा पुत्र पुलकितवर आहे. 19 वर्षीय अंकिता ही त्याच्या रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. 17 सप्टेंबर रोज ती पुलकित आर्य, रिसॉर्ट मॅनेजल सौरभ भास्कर अन् अंकित गुप्तासोबत ऋषिकेश येथे गेली होती, तेथून ती परतली नव्हती. पोलिसांना अंकिताचा मृतदेह मिळाला होता. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.