जळगाव / प्रतिनिधी :
Jalgaon Milk Union Election जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीत मुक्ताईनगर तालुका प्रतिनिधी म्हणून भाजपा आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी दाखल केलेल्या अर्जावर त्यांची उमेदवारी रद्द करावी, म्हणून मुक्ताईनगरच्या उमेदवार मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच आ. मंगेश चव्हाण यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. उच्च न्यायालयाचा हा निर्णय एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात असून, खडसेंच्या पराभवासाठी राज्याचे दोन मंत्री आणि सात आमदार एकत्ररित्या मैदानात उतरले आहेत.
भाजपा आ. मंगेश चव्हाण यांनी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात मुक्ताईनगर तालुका मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. अर्ज छाननीच्या वेळी मंदाताई खडसे यांनी आ.चव्हाण हे चाळीसगाव तालुक्यातील असतांना अर्ज मुक्ताईनगर मधून कसा, असा सवाल करत हरकत घेतली होती. मात्र, जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यातून कोठेही अर्ज दाखल करता येण्याच्या नव्या नियमाने आ. मंगेश चव्हाणांचा अर्ज वैध ठरवला गेला होता. या विरोधात मंदाताई खडसे या उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आमदार चव्हाणांचा अर्ज बाद करवण्यासाठी याचिका दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावत आ. मंगेश चव्हाणांबाबतचा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय कायम ठेवला.