वृत्तसंस्था/ बॅसेटेरे
कॅरेबियन प्रिमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत जमैका तलावाजने विद्यमान विजेत्या सेंट किट्स-नेव्हिस पेट्रीयॉट्सचा पराभव करत विजयी सलामी दिली. जमैका थलैवाजने हा सामना 47 धावांनी जिंकला.
या सामन्यात सेंट किट्स-नेव्हिस पेट्रीयॉट्सने नाणेफेक जिंकून जमैका थलैवाजला प्रथम फलंदाजी दिली. जमैका तलावाजने 20 षटकात 2 बाद 183 धावा जमविल्या. त्यानंतर सेंट किट्स-नेव्हिस पेट्रीयॉट्सचा डाव 18 षटकात 138 धावात आटोपला.
जमैका तलावाजच्या डावामध्ये ब्रेन्डॉन किंगने 57 चेंडूत 89 धावा झोडपल्या. किनेर लेविसने 48 धावांचे योगदान दिले. या सलामीच्या जोडीने पहिल्या गडय़ासाठी 116 धावांची शतकी भागीदारी केली. जमैका तलावाजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने 15 चेंडूत नाबाद 30 धावा झळकविल्या. पेट्रीयॉट्सतर्फे जेनसेनने आपली पहिली तीन षटके किफायतशीर टाकली. त्यानंतर किंगच्या फटकेबाजीला पेट्रीयॉट्सचे गोलंदाज रोखू शकले नाहीत. किंगने अकिला धनंजय आणि जॉन जॅगेसेर यांच्या प्रत्येकी एक षटकात अनुक्रमे 14 आणि 19 धावा घेतल्या. लेविस दोनवेळा धावचीत होताना बचावला. तसेच लेविसला दोन जीवदानेही मिळाली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पेट्रीयॉट्सच्या डावात रुदरफोर्डने 33 तर आंदे फ्लेचरने 31 धावा जमविल्या. जमैका तलावाजतर्फे गॉर्डनने 32 धावात 3, इमाद वासिमने 20 धावात 2 आणि मिगेल प्रेटोरियसने 35 धावात 2 बळी मिळविले. तलावाजच्या अचूक गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणासमोर पेट्रीयॉट्सचे फलंदाज चुकीचे फटके मारण्याच्या नादात बाद झाले. या संघाला पूर्ण 20 षटके खेळता आली नाहीत.
संक्षिप्त धावफलक
जमैका तलावाज 20 षटकात 2 बाद 183 (बेन्डॉन किंग 89, के. लेविस 48, आर. पॉवेल नाबाद 30), सेंट किट्स-नेव्हिस पेट्रीयॉट्स 18 षटकात सर्वबाद 138 (एस. रुदरफोर्ड 33, फ्लेचर 31, गॉर्डन 3-32, इमाद वासिम 2-20, प्रेटोरियस 2-35).