आयपीएसच्या भूमिकेत रेजिना कॅसेंड्रा
‘अभय’पासून ‘रंगबाज’ यासारख्या वेबसीरिज देणाऱया झी5ने स्वतःची नवी वेबसीरिज ‘जांबाज हिंदुस्थान के’ची घोषणा केली आहे. तसेच या वेबसीरिजचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत भरलेली ही सीरिज क्राइम थ्रिलर धाटणीची असून यात रेजिना कॅसेंड्रा मुख्य भूमिकेत आहे.
जगरनॉटकडून निर्मित आणि श्रीजीत मुखर्जी यांच्याकडून दिग्दर्शित या सीरिजची कहाणी एका महिला आयपीएस अधिकाऱयावर आधारित आहे. काव्या हे नाव असलेल्या अधिकाऱयाची भूमिका रेजिना साकारत आहे. श्रीजीत मुखर्जी यांच्याकडून दिग्दर्शित सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याने मी अत्यंत उत्साही आहे. या क्राइम थ्रिलरचे 4 राज्यांमध्ये चित्रिकरण करण्यात आले आहे. आयपीएस अधिकाऱयाचा गणवेश परिधान करणे माझ्यासाठी अत्यंत चांगला अनुभव होता. ही आतापर्यंत मी साकारलेली सर्वात सशक्त व्यक्तिरेखा असल्याचे रेजिनाने म्हटले आहे.
झी5ची ही नवी वेबसीरिज सत्यघटनांवर प्रेरित असून यात पोलीस अधिकाऱयांच्या समर्पणाची कहाणी दर्शविण्यात येणार आहे. लवकरच या सीरिजला प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ही सीरिज हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये स्ट्रीम होणार आहे.