वृत्तसंस्था/ लंडन
येथे सुरू असलेल्या तिसऱया आणि शेवटच्या कसोटीत डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सेनच्या भेदक माऱयासमोर इंग्लंडचा पहिला डाव 158 धावात आटोपला. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 118 धावात संपुष्टात आल्याने इंग्लंडने पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेवर 40 धावांची आघाडी मिळविली. पण त्यानंतर रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी उपाहारापर्यंत दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱया डावात 19 षटकात 1 बाद 70 धावा जमवित इंग्लंडवर 30 धावांची आघाडी मिळविली होती.
तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना केवळ तीन दिवसात जिंकून बरोबरी साधल्याने ही शेवटची कसोटी निर्णायक ठरली आहे. या कसोटीतही गोलंदाजी फलंदाजीच्या तुलनेत अधिक प्रभावी होत आहे. या शेवटच्या कसोटीतील खेळाचा पहिला संपूर्ण दिवस पावसामुळे वाया गेला. त्यानंतर इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांच्या निधनामुळे या कसोटीतील दुसरा दिवस रद्द करण्यात आला होता. या कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवशी चार सत्रामध्ये एकूण 20 गडी बाद झाले होते. दोन्ही संघातील वेगवान गोलंदाज प्रभावी कामगिरी करत असून त्यांना खेळपट्टीची साथ मिळत असल्याचे दिसून येते.
इंग्लंडने 7 बाद 154 या धावसंख्येवरून रविवारी चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे तीन गडी केवळ 4 धावांची भर घालत तंबूत परतले. इंग्लंडच्या पहिल्या डावामध्ये ऑली पॉपने 13 चौकारासह 67 धावांची खेळी केली. रुटने 3 चौकारासह 23, फोक्सने 1 चौकारासह 14, ब्रुकने 2 चौकारासह 12, लिसने 1 चौकारासह 13 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे जॅन्सेनने 35 धावात 5 तर रबाडाने 81 धावात 4 तसेच नॉर्त्जेने 29 धावात 1 गडी बाद केला.
40 धावांनी पिछाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱया डावाला सावध सुरुवात केली. कर्णधार एल्गार आणि इर्वे या सलामीच्या जोडीने 58 धावांची भागीदारी केली. उपाहारापूर्वी इंग्लंडच्या स्टोक्सने इर्वेला झेलबाद केले. त्याने 3 चौकारासह 26 धावा जमविल्या. उपाहारावेळी द.आफ्रिकेने 19 षटकात 1 बाद 70 धावा जमविल्या होत्या. कर्णधार एल्गार 6 चौकारासह 35 तर पीटरसन 7 धावावर खेळत होते.
संक्षिप्त धावफलक ः दक्षिण आफ्रिका प. डाव 36.2 षटकात सर्वबाद 118, इंग्लंड प. डाव 36.2 षटकात सर्वबाद 158 (पॉप 67, रुट 23, लिस 13, फोक्स 14, ब्रुक 12, जॅन्सेन 5-35, रबाडा 4-81, नॉर्त्जे 1-29), दक्षिण आफ्रिका दु. डाव उपाहारापर्यंत 1 बाद 70 (इर्वे 26, एल्गार खेळत आहे 35, पीटरसन खेळत आहे 7, स्टोक्स 1-6).