सर्वाधिक प्राधान्याचा देशाचा दर्जा रशियाने गमावला
जपानने युक्रेनवरील आक्रमणावरुन बुधवारी रशियाला प्रदान करण्यात आलेला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा औपचारिक स्वरुपात रद्द केला आहे. युक्रेनच्या नागरिकांवर रशियाकडून अत्याचार होत असल्याच्या खुलाशानंतर जपानने त्याच्या विरोधातील निर्बंध वाढविले आहेत.
रशियाचा व्यापादर दर्जा संपुष्टात आणण्याचे पाऊल जपानने उचलले आहे. मागील महिन्यात पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याकडून घोषित निर्बंधांमध्ये 8 रशियन मुत्सद्दी आणि व्यापार प्रतिनिधींच्या हकालपट्टीचा निर्णय देखील समाविष्ट होता.
जपानकडून लादण्यात आलेल्या निर्बंधांनंतर रशिया देखील प्रत्युत्तरादाखल अशाचप्रकारचे पाऊल उचलू शकतो. मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा गमावल्याने रशियन उत्पादनांवर आता जपानमध्ये आयात शुल्क लागू होणार आहे. पूर्व आशियातील हितसंबंध पाहता जपान रशियाच्या विरोधातील आंतरराष्ट्रीय सामूहिक प्रयत्नांमध्ये एक मोठी भूमिका बजावत आहे. काही बेटांवरून जपान आणि रशिया यांच्यात दीर्घकालीन वाद प्रलंबित आहे.


जपानने रशियाच्या अनेक नागरिकांची आणि कंपन्यांची मालमत्ता गोठविली आहे. तसेच नवी गुंतवणूक आणि व्यापारावरही बंदी घातली आहे. सैन्य उद्देशासाठी वापरता येणाऱया उत्पादनांच्या निर्यातीवरही बंदी घालण्यात आली आहे.
तसेच रशियाकडून होणारी कोळशाची आयात कालबद्ध पद्धतीने समाप्त करण्याची योजना जपानने जाहीर केली आहे. जपानकडून हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आल्यावर रशियाचे 8 अधिकारी बुधवारी मायदेशी परतले आहेत.
रशियाने अलिकडेच जपानसोबतच्या एका शांतता करारावरील चर्चा स्थगित करण्याची घोषणा केली होती. रशियाच्या ताब्यातील बेटांसंबंधीचा मुद्दा या चर्चेत सामील होता. दुसऱया महायुद्धाच्या अखेरीस या बेटांवर सोव्हियत महासंघाने कब्जा केला होता.