विजय मिळवूनही जर्मनी स्पर्धेबाहेर, पराभवानंतरही स्पेनची आगेकूच
वृत्तसंस्था/ अल खोर, कतार
जर्मनीचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान सलग दुसऱयांदा गट साखळी फेरीतच समाप्त झाले. चार वेळच्या विजेत्या जर्मनीने गटातील शेवटच्या सामन्यात कोस्टारिकावर 4-2 असा विजय मिळविला असला तरी त्यांना बाद फेरीत प्रवेश मिळविता आला नाही. गट ई मधील अन्य एका सामन्यात जपानने स्पेनवर 2-1 मात केली. मात्र या दोन्ही संघांनी बाद फेरीत प्रवेश मिळविला आहे.
गट ई मध्ये जपानने तीनपैकी 2 सामने जिंकून 6 गुणांसह अग्रस्थान मिळविले तर 3 सामन्यांत एक विजय, एक बरोबरीने 4 गुण घेत स्पेनने दुसरे स्थान मिळविले. जर्मनीचेही स्पेनइतकेच 4 गुण झाले. पण सरस गोलफरकामुळे स्पेनला दुसरे स्थान मिळाले. कोस्टारिकाने एक विजय मिळवित 3 गुण मिळविले. मागील वेळीही जर्मनी विद्यमान विजेते म्हणून स्पर्धेत उतरले होते. पण त्यावेळीही त्यांना साखळी फेरीतच स्पर्धेबाहेर पडावे लागले होते. येथील पहिल्या सामन्यात जर्मनीला जपानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आगेकूच करण्यासाठी शेवटच्या सामन्यात त्यांना विजयासह दुसऱया सामन्याच्या निकालावर अवलंबून रहावे लागले होते. पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काहीही झाले नाही. स्पेनने जपानला हरविले असते तर जर्मनीला गटातील दुसऱया स्थानासह बाद फेरीत स्थान मिळाले असते. स्पेनने पहिल्या सामन्यात कोस्टारिकावर 7-0 असा मोठा विजय मिळविला होता, त्याचा त्यांना येथे फायदा झाला. हा मोठा विजयच त्यांना बाद फेरी गाठण्यात उपयोगी पडला.


या सामन्यात दहाव्या मिनिटाला सर्ज नॅब्रायने हेडरवर जर्मनीला आघाडी मिळवून दिली. त्याचवेळी दोहातील अल खलिफा स्टेडियमवर स्पेनने जपानवर आघाडी घेतली. या दोन्ही सामन्यांना उत्तरार्धात कलाटणी मिळाली. 58 व्या मिनिटाला येल्त्सीन तेजेदाने गोल नोंदवून कोस्टारिकाला बरोबरी साधून दिली आणि नंतर 70 व्या मिनिटाला जुआन व्हर्गासने दुसरा गोल नोंदवून कोस्टारिकाला 2-1 अशी आघाडी मिळवून देत बाद फेरी गाठण्याच्या दिशेने आगेकूच केली होती. पण जर्मनीचा बदली खेळाडू काइ व्हॅवर्ट्झने तीन मिनिटानंतर जर्मनीला 2-2 अशी बरोबरी साधून दिली आणि 85 व्या मिनिटाला तिसरा गोल नोंदवून 3-2 अशी पुन्हा आघाडी घेतली. आणखी एक बदली खेळाडू निकलास फ्युलपुगने त्यात आणखी एका गोलाची भर घालत ही आघाडी 4-2 अशी केली. याच फरकाने जर्मनीने विजय मिळविला. पण तो पुरेसा ठरला नाही. त्यांनी आणखी पाच गोल नोंदवले असते तर त्यांची स्पेनशी बरोबरी झाली असती.
स्पेनची उपांत्यपूर्व लढत मोरोक्कोविरुद्ध तर जपानचा मुकाबला क्रोएशियाविरुद्ध होईल. या सामन्याचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे फ्रान्सच्या महिला रेफरी स्टेफनी प्रॅपार्ट यांनी प्रथमच पुरुषांच्या वर्ल्ड कपमध्ये रेफरीचे काम पाहिले.
जपानची स्पेनवर मात
दोहा येथे झालेल्या याच गटातील अन्य एका सामन्यात जपानने स्पेनवर 2-1 अशा फरकाने मात करीत सलग दुसऱयांदा बाद फेरी गाठली. स्पेन पराभूत झाले असले तरी सरस गोलफरकाच्या आधारे जर्मनीला मागे टाकत त्यांनी बाद फेरी गाठली. जपाने पिछाडी भरून काढत स्पेनवर विजय मिळवित आणखी एका युरोपियन संघाला हरविले. सलग दोन वर्ल्ड कपमध्ये बाद फेरी गाठण्याची जपानची ही पहिलीच वेळ आहे. उत्तरार्धातील सुरुवातीच्या काही मिनिटातच अओ तनाकाने जपानचा विजयी गोल नोंदवला. या गोलचा निर्णय देण्यासाठी व्हीआरएवर दोन मिनिटे रिव्हय़ू पहावा लागला.
अल्वारो मोराटाने 11 व्या मिनिटाला स्पेनला आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात त्यांनी ही आघाडी कायम राखली. पण उत्तरार्धात जपानने प्रथम बरोबरी साधली. 48 व्या मिनिटाला रित्सू डोअनने बॉक्सच्या बाहेरून डाव्या पायाने फटका लगावत हा गोल नोंदवला. तीन मिनिटानंतर तनाकाने दुसरा गोल नोंदवून जपानचा विजय निश्चित केला.
1950 नंतर मोराटा हा विश्वचषकातील पहिल्या तीन सामन्यांत गोल नोंदवणारा स्पेनचा पहिला खेळाडू बनला आहे. 1950 मधील स्पर्धेत टेल्मो झाराने असा पराक्रम केला होता. स्पेनने येथील स्पर्धेत कोस्टारिकावर मोठा विजय मिळविल्यानंतर जर्मनीला 1-1 असे बरोबरीत रोखले. जपानला रशियात झालेल्या मागील स्पर्धेत शेवटच्या सोळा फेरीत बेल्जियमकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यांना उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे अद्याप मजल मारता आलेली नाही.
आजचे उपांत्यपूर्व सामने
1) नेदरलँड्स वि. अमेरिका
वेळ ः रात्री 8.30 वा.
2) अर्जेन्टिना वि. ऑस्ट्रेलिया
वेळ ः मध्यरात्री 12.30 वा.