दैत्यांच्या जागराला मोठय़ा संख्येने भाविकांची उपस्थिती
प्रतिनिधी / काणकोण
तीन वर्षांनी होणाऱया पैंगीणच्या श्री बेताळ देवालयाच्या गडय़ांच्या जत्रेचा एक भाग असलेल्या दैत्यांच्या जागराला 11 रोजी सतत पडत असलेल्या पावसाची तमा न बाळगता हजारो भाविकांनी वेळेची पर्वा न करता उपस्थिती लावली आणि या पारंपरिक उत्सवाची मजा लुटली. रात्री साधारणपणे 9.30 च्या दरम्यान सुरू झालेल्या या उत्सवाची सांगता मध्यरात्री 1 च्या दरम्यान झाली. त्यापूर्वी श्री बेताळ देवाची पूजा, तरंगोत्सव, अवसर या सर्व पारंपरिक विधींमध्ये भक्तांनी भाग घेतला आणि देवस्थानचे माजी अध्यक्ष दामोदर फळगावकर, तिन्ही गावचे अग्रासनी पांडुरंग अग्रासनी यांच्या उपस्थितीत गडय़ांच्या जत्रेच्या उत्सवाला प्रारंभ झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी श्री परशुराम देवस्थानचे अर्चक निशाकांत टेंगसे, देवस्थान समितीचे अध्यक्ष उदय प्रभुगावकर, समितीचे अन्य पदाधिकारी, श्री परशुराम पंचैग्राम देवस्थानचे चौगुली, श्री बेताळ देवाचे अर्चक रामदास पुजारी, बारा बलुतेदार, अन्य वेळीप बांधव यांच्या उपस्थितीत सुरेश पेडणेकर, सागर पेडणेकर आणि कुटुंबियांनी पारंपरिक पेरणी जागर सादर केला. श्री नवदुर्गा देवीने सज्जन भाविकाच्या अंगात नवचंडी रूपाने संचार करून प्रथम किटू, व मादू नामक दैत्य आणि त्यानंतर महिषासुराला कसे यमसदनी पाठविले त्याचे सादरीकरण झाले. यावेळी आबालवृद्धांकडून लाठय़ा-काठय़ांचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात आला. यानंतर 18 रोजी चोरांचा जागर, तर 20 रोजी दिवजांचा जागर होणार आहे.