सीमाप्रश्नाबाबत म. ए. समिती नेतेमंडळींशी केली चर्चा
प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्राचे माजी मंत्री व सीमाप्रश्न खटल्यातील तज्ञ समितीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी सकाळी बेळगावला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतेमंडळींशी सीमाप्रश्नाच्या खटल्याबाबत चर्चा केली.
आजरा येथे एका कार्यक्रमासाठी ते शुक्रवारी सकाळी बेळगाव विमानतळावर दाखल झाले. चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱयांनी त्यांची भेट घेतली. चार दिवसांपूर्वी झालेल्या सीमाप्रश्नाच्या खटल्याबद्दल जयंत पाटील यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. 15 सप्टेंबर रोजी मुंबई येथे तज्ञ समिती व उच्चाधिकार समितीची बैठक होणार आहे. यासंदर्भात त्यांनी म. ए. समितीच्या पदाधिकाऱयांशी चर्चा केली.
यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, सुनील आनंदाचे, महेश जुवेकर यांसह इतर उपस्थित होते.