राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची आंदोलकांना ग्वाही : साखळी उपोषणाला भेट देत उपोषण मागे घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी/कोल्हापूर
जयप्रभा स्टुडीओची जागा कोल्हापूरची अस्मिता असून, कोल्हापूरकर आणि कलाकारांच्या भावनांचा अनादर होणार नाही. गेल्या काही दिवसापासून ही जागा शासनाच्या ताब्यात घेवून, विकासकाला पर्यायी जागा देण्याबाबत शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. पुढील आठवडय़ात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून याविषयी पुन्हा सकारात्मक चर्चा करणार आहे. येत्या तीन महिन्यात स्टुडीओच्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आंदोलकांना दिली.
जयप्रभा स्टुडीओ येथे चित्रपट महामंडळाच्यावतीने सुरु असलेल्या साखळी उपोषणास क्षीरसागर यांनी भेट दिली. स्टुडीओ परिसराची पाहणी करून चित्रतपस्वी भालजी पेंढारकर आणि दादासाहेब फाळके यांना अभिवादन केले.
राजेश क्षीरसागर म्हणाले, कलाकार आणि मराठी चित्रपट सृष्टीच्या उन्नतीसाठी शिवसेना नेहमीच प्रयत्नशील आहे. जयप्रभा स्टुडीओच्या जागेसाठी 2012 मध्ये झालेल्या आंदोलनात मी सहभागी होतो. लोकभावनांचा आदर ठेवून खरेदीदार कंपनीस पर्यायी जागा स्विकारून स्टुडीओची जागा शासनाच्या ताब्यात देण्याच्या सूचना दिल्या आहेत. नगरविकास मंत्री शिंदे यांची भेट घेवून त्यांना निवेदन सादर केले आहे. या प्रकरणाची सर्व माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे. कोल्हापूर महापालिका प्रशासनाने विकासकाला पर्यायी जागा देवून स्टुडीओची जागा महापालिकेकडे वर्ग करून घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. तसा नगरविकास विभागानेही प्रस्ताव मागविला असून, हा प्रस्ताव लवकरच नगरविकास विभागाकडे सादर केला जाईल. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी सकारात्मक कार्यवाही होत असताना काही लोकांचा आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सुरु आहे.
स्टुडीओची जागा सन 1947 दरम्यान संस्थान काळात संस्थानाचे मंत्री रावसाहेब बागवे यांनी भालजी पेंढारकर यांना खरेदीपत्रकाने विक्री केली. सदर विक्रीचा ठराव जी. आर. डी. 132 ने मान्यता देत याची सनद केली होती. सन 1950 मध्ये भालजी पेंढारकर यांनी इंडियन सिटीझन बँकेकडून कर्ज घेतले. या कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेने सन 1960 मध्ये या जागेचा तीनवेळा लिलाव काढला. पहिल्या दोन लिलावात लता मंगेशकर सहभागी नव्हत्या. या जागेचे व्यापारीकरण न होता ही जागा चित्रपट निर्मितीसाठीच रहावी, असे सांगत तत्कालीन लोकांनी लता मंगेशकर यांना लिलावात सहभागी होण्याची विनंती केली. लोकांच्या विनंतीला मान देवून त्यांनी लिलावात भाग घेत सर्वात जास्त बोली लावून स्टुडीओची जागा खरेदी केली. मे. न्यायालयामार्फत खरेदी मान्यता दिली आहे. अशी सत्यपरिस्थिती असताना लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. मीही कार्यकर्त्याचा आमदार झाल्याने चळवळीची जाण मला आहे.
कोल्हापूरच्या प्रत्येक चळवळीत मी सहभाग आहे. त्यामुळे जनभावनांचा अनादर होणार नाही, पुढच्या आठवडय़ात पुन्हा नगरविकास मंत्री शिंदे यांची भेट घेवून, या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, रणजीत जाधव, सचिन बिडकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आर. के. पोवार, बाबा पार्टे, मिलिंद आष्टेकर, अमोल मोरे आदी सभासद व कलाकार उपस्थित होते.
उपोषण मागे घ्या
जयप्रभा स्टुडीओसाठी कोटय़ावधींचा निधी उपलब्ध करून, या जागेत चित्रिकरणासाठी व कलाकारांसाठी आवश्यक बाबी पुरवून स्टुडीओचा विकास करण्यास मी प्रयत्नशील आहे. तरी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन क्षीरसागर यांनी केले.