कार्तिक आर्यनसोबत दिसण्याची शक्यता
टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर विंगेटच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. जेनिफर आता मोठय़ा पडद्यावर झळकणार आहे. जेनिफर लवकरच कार्तिक आर्यनसोबत हिंदी चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी दोघांशीही संपर्क साधला आहे.
जेनिफर ही टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री असण्यासह हायएस्ट पेड (सर्वाधिक शुल्क आकारणारी) अभिनेत्री आहे. तिने कसौटी जिंदगी की, दिल मिल गए, सरस्वतीचंद्र, बेहद या टीव्ही मालिकांमधील स्वतःच्या अभिनयाद्वारे स्वतःचा ठसा उमटविला आहे. छोटय़ा पडद्यासह तिने चित्रपटांमध्ये बाल कलाकार म्हणूनही काम केले आहे. अकेले हम अकेले तुम, राजा की आएगी बारात, राजा को रानी से प्यार हो गया, कुछ ना कहो आणि फिर से हे चित्रपट यात सामील आहेत.
कार्तिक आर्यनचा ‘भूल भूलैया 2’ हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला असून याला बॉक्स ऑफिसवर मोठा प्रतिसाद मिळाला आहे. कार्तिककडे सध्या शहजादा आणि प्रेडी चित्रपट आहेत. शहजादा चित्रपटात तो क्रीति सेनॉनसोबत दिसून येणार आहे. कार्तिक सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक मागणी असलेला कलाकार आहे.