वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हवाई क्षेत्रातील कंपनी जेट एअरवेजची सेवा 2019 मध्ये बंद करण्यात आली होती. परंतु मुरारीलाल जालान आणि कॉलरॉक कन्सोर्टियम यांनी जून 2021 मध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल यांच्या देखरेखीखाली बोली जिंकली होती. जेट एअरवेजला पुनर्पमाणीकरणाला लवकरच परवानगी अपेक्षीत आहे. यानंतरच उड्डाणाच्या प्रक्रियेला अधिक गती मिळणार आहे. कन्सोर्टियमने येत्या 5 वर्षात कर्जापैकी 1183 कोटी रुपये टप्प्याटप्प्याने भरण्याचे मान्य केले आहे.
तीन वर्षानंतर पुन्हा उड्डाण
जवळपास तीन वर्षांच्या कालावधीनंतर जेट एअरवेज आता पुन्हा उड्डाण करण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये जेट एअरवेजची विमाने उड्डाण करण्यासाठी सज्ज होणार आहेत, असे समजते.
एप्रिलअखेरपर्यंत मिळेल परवानगी
हवाई कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कपुर यांच्या मते, जुलै-सप्टेंबरपर्यंत उड्डाणासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. एप्रिलच्या अखेरपर्यंत कंपनीला विमानांचे उड्डाण करण्यासाठी परवानगी मिळण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखविली आहे. आमच्या गरजा आणि एकंदर खर्च त्याचप्रमाणे लाभांचा विचार करून निर्णय घेतला जाणार आहे. सदरची कंपनी ही मोठय़ा कर्जाखाली दबली गेली होती. म्हणूनच 2019 पासून कंपनीची विमानसेवा बंद होती.