आणखी चार घरे फोडण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी /बेळगाव
वाघवडे (ता. बेळगाव) येथे चोरटय़ांनी अक्षरशः धुडगूस घातला आहे. एका बंद घराचे कुलूप तोडून दोन लाखांचे दागिने पळविण्यात आले असून याच गावातील आणखी चार घरे फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. चोरीच्या या प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे.
गंगाराम पाटील या शेतकऱयाच्या घरी चोरीची घटना घडली आहे. गंगाराम हे शेतातील घरात राहतात. गावातही त्यांचे एक घर आहे. शनिवारी सायंकाळी 6 ते रविवारी सकाळी 8 या वेळेत चोरीची ही घटना घडली असून कुलूप तोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केल्याचे उघडकीस आले आहे.
गंगाराम यांच्या घरातील चार तोळे सोने व नऊ तोळे चांदीचे दागिने पळविण्यात आले आहेत. या घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. बेळगाव शहर व तालुक्यात चोऱया, घरफोडय़ा वाढल्या असून हे गुन्हे रोखण्यास पोलीस दल अपयशी ठरले आहे.