काम करत असलेल्या दुकानातच चोरी : 643 ग्रॅम दागिन्यांसह हुक्केरीतील संशयित तरुणाला अटक, हिंडलगा कारागृहात रवानगी
बेळगाव : आपण काम करत असलेल्या सराफी दुकानात चोरी केल्याच्या आरोपावरून हुक्केरी येथील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. हुक्केरी पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याच्याजवळून सुमारे 36 लाख 81 हजार 528 रुपये किमतीचे 643 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. गिरीश अशोक कंठी (वय 28, रा. हुक्केरी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी शुक्रवारी एका पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, गिरीश हा हुक्केरी येथील पोतदार ज्वेलर्समध्ये सेल्समनचे काम करत होता. डिसेंबरमध्ये सदर दुकानातील 643 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचा प्रकार घडला होता. त्याची फिर्याद पोलिसांत नोंद करण्यात आली होती. दरम्यान, गिरीश याने चोरलेले सोने मनिपुरम् कॉर्प फायनान्समध्ये 522 ग्रॅम, आयआयएफसी फायनान्समध्ये 110 ग्रॅम, मुथुट फायनान्समध्ये 10 ग्रॅम गहाण ठेऊन पैसे घेतले होते. सदर पैसे त्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवले होते. अधिक फायदा मिळावा यासाठी केलेली गुंतवणूक शेअर मार्केट कोसळू लागल्याने बुडू लागली होती. त्यातून गिरीश याला मानसिक नैराश्य आले होते. त्यातून तो अस्वस्थ राहू लागल्याने पोलिसांना त्यावर संशय येऊ लागला. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केल्यानंतर आपणच सोने चोरी केल्याची कबुली त्याने दिली.
हुक्केरी पोलिसांच्या पथकाला 10 हजार रुपयांचे बक्षीस
गोकाकचे पोलीस उपअधीक्षक दूधपिर मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हुक्केरीचे पोलीस निरीक्षक एम. एम. तहसीलदार, साहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एस. सनदी, सी. डी. पाटील, लक्ष्मण एस. कोचरी, मंजुनाथ एस. कब्बुरी, गजानन कांबळे, सद्दाम आर. रामदुर्ग, अजित नाईक, आर. अतंरगट्टी यांनी सदर कारवाई केली. दरम्यान, सराफी पेढीतील चोरी प्रकरणाचा छडा लावणाऱ्या हुक्केरी पोलिसांच्या पथकाला जिल्हा पोलीसप्रमुखांनी 10 हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.