आसाम पोलिसांची कारवाई : गुजरातमधून अटक
अहमदाबाद / वृत्तसंस्था
गुजरातमधील वडगाम येथील आमदार जिग्नेश मेवाणी यांना आसाम पोलिसांनी अटक केली. बुधवारी रात्री 11.30 वाजता गुजरातमधील पालनपूर सर्किट हाऊस येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले. पालनपूर येथून जिग्नेशला रात्री उशिरा रस्तामार्गाने अहमदाबादला आणण्यात आले. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी रेल्वेने गुवाहाटी येथे नेण्यात आले. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधी वादग्रस्त ट्विट केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सुरुवातीला त्यांना झालेली ही अटक कशामुळे झाली हे स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी अटकेचे कारणही दिलेले नाही. मात्र, जिग्नेश यांनी आपल्या अटकेची माहिती स्वतः ट्विटरच्या माध्यमातून दिली.
दलित नेते आणि राजकीय पक्ष राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे निमंत्रक जिग्नेश मेवाणी यांनी वडगाममधून 2017 ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. गुजरातचे दलित नेते म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. सप्टेंबर 2021 मध्ये राहुल गांधी आणि कन्हैया कुमार यांच्यासोबत पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता.