मेहसाणा : गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रेश्मा पटेल आणि सुबोध परमार यांना गुरुवारी मेहसाणा न्यायालयाने तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय न्यायालयाने या सर्वांना एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या सर्वांवर 2017 मध्ये विनापरवानगी ‘आझादी मार्च’ काढल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मेहसाणा न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. याप्रकरणी न्यायालयाने एकूण 12 जणांना शिक्षा सुनावली आहे.
परवानगीशिवाय ‘आझादी मार्च’ काढल्याच्या पाच वर्षे जुन्या प्रकरणात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. ए. परमार यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 143 नुसार बेकायदेशीर सभेचा भाग असल्याबद्दल दोषी ठरवले. न्यायालयाने सर्व दोषींना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. मेहसाणा ‘ए’ डिव्हिजन पोलिसांनी जुलै 2017 मध्ये मेवाणी आणि इतरांविरुद्ध आयपीसी कलम 143 अंतर्गत मेहसाणा ते बनासकांठा जिह्यातील धानेरा असा ‘आझादी मार्च’ परवानगीशिवाय काढल्याबद्दल एफआयआर नोंदवला होता. पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या समर्थक असलेल्या रेश्मा पटेल या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. एफआयआरमध्ये नाव असलेल्या एकूण 12 आरोपींपैकी एकाचा मृत्यू झाला होता, तर एक अद्याप फरार आहे.