नव्या याचिकेवर झाला निर्णय ः हिंदू पक्षकारांच्या 4 मागण्या
वृत्तसंस्था/ वाराणसी
ज्ञानवापी मशिदीत मिळालेल्या कथित शिवलिंगाच्या पूजेची अनुमती मागणारी यचिका जलदगती न्यायालयासमोर वर्ग करण्यात आली आहे. आता याप्रकरणी 30 मे रोजी सुनावणी होणार आहे. वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांनी बुधवारी यासंबंधी निर्णय दिला आहे. या याचिकेवरील सुनावणी आता न्यायाधीश महेंद्र पांडे करणार आहेत.
हिंदू पक्षकारांनी न्यायालयात एक याचिका दाखल करत यात ज्ञानवापी मशीद हिंदूंना सोपविण्याची आणि पूजा करण्याची अनुमती देण्याची मागणी कली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली आहे. वाराणसी जिल्हा न्यायाधीशात ज्ञानवापी प्रकरणी आणखीन एक याचिका असून त्यावर 26 मे रोजी म्हणजेच आज सुनावणी होणार आहे.
तर पूजेची अनुमती देण्याची मागणी करणारी याचिका विश्व वैदिक सनातन संघाचे प्रमुख जितेंद्र सिंह बिसेन यांची पत्नी आणि विश्व वैदिक सनातन संघाच्या पदाधिकारी किरण सिंह यांच्याकडून दाखल करण्यात आली होती. या याचिकेत ज्ञानवापी परिसर हिंदू पक्षकारांना सोपविण्याची आणि ज्ञानवापीमध्ये तत्काळ प्रभावाने पूजा, दर्शन करण्याची अनुमती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याचिकेतील मागण्या
-ज्ञानवापी परिसरात मुस्लिमांचा प्रवेश रोखण्यात यावा
-ज्ञानवापी परिसर पूर्णपणे हिंदूंकडे सोपविण्यात यावा
-भगवान विश्वेश्वर शिवलिंगाच्या पूजेची अनुमती मिळावी
मशिदीचा गुबंद पाडविण्यात यावा