ऑनलाईन टीम / मुंबई :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. शांतिश्री पंडित यांची जेएनयु विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या विद्यापीठाला इतिहासात पहिल्यांदाच एक महिला कुलगुरू मिळाली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून त्यांच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.
JNU चे कुलगुरू जगदेश कुमार यांचा जानेवारी अखेरीस पाच वर्षांचा कार्यकाळ संपला. त्यांची नियुक्ती विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्ष पदी झाली. त्यामुळे त्यांच्या जागी पंडित यांची नियुक्ती करण्यात आली. शांतिश्री पंडित या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक आहेत. त्यांनी JNU विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंध या विषयावर एमफील आणि पीएचडी केली आहे. त्या इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या सदस्य आहेत. त्यांनी गोवा विद्यापीठात 1988 ला अध्यापनाला सुरुवात केली. त्यानंतर 1993 मध्ये त्या पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. युजीसीच्या अनेक समित्यांवर सदस्य म्हणूनही त्या सध्या काम पाहतात. हिंदी, इंग्रजी, मराठी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या सहा भाषांमध्ये त्या पारंगत आहेत.