पाच गुह्यांचा उलगडा : साडेआठ लाखांचा ऐवज जप्त : पोलीस उपायुक्तांचा पुढाकार
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांत भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या जोडगोळीला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या टेळीतील आणखी दोघे जण फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या दोघा जणांकडून साडेआठ लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी ही माहिती दिली आहे.
कृष्णा ऊर्फ राजू अशोक रामण्णावर (वय 23, मूळचा रा. बडाल अंकलगी, सध्या रा. नावगे), नागराज ऊर्फ अप्पू संगाप्पा बुदली (वय 30, रा. रंगधोळी, ता. बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. बेळगाव ग्रामीणचे एसीपी एस. व्ही. गिरीश, पोलीस निरीक्षक श्रीनिवास हंडा, पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
नववर्षात घडलेल्या 5 गुह्यांचा उलगडा
नववर्षात घडलेल्या चार गुह्यांसह एकूण 5 गुह्यांचा उलगडा झाला आहे. कृष्णा व नागराज हे दोघे मच्छे औद्योगिक वसाहतीतील वेगवेगळ्या कारखान्यात काम करीत होते. दिवसा कारखान्यात काम करायचे व रात्री चोरीसाठी बाहेर पडायचे. काही वेळा भरदिवसा घरफोड्या करून ऐवज लांबवायचे. या जोडगोळीला अटक झाली नसती तर संपूर्ण शहरात धुमाकूळ घालण्याची तयारी त्यांनी केली होती.
चेनस्नॅचिंग प्रकरणांचीही कबुली
त्यांच्याजवळून एक कार, दोन मोटारसायकली, सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप, टीव्ही असा एकूण 8 लाख 50 हजार रुपये किमतीचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील तीन घरफोड्यांचा उलगडा झाला आहे. एपीएमसी व उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या चेनस्नॅचिंग प्रकरणांचीही या जोडगोळीने कबुली दिली आहे.
आणखी दोन साथीदार फरारी
7 जानेवारी 2023 रोजी मच्छे औद्योगिक वसाहतीत कृष्णा व नागराज यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांचे आणखी दोघे साथीदार फरारी झाले आहेत. त्यांना अटक झाल्यानंतर बऱ्याच घरफोड्यांचा तपास लागणार आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
दत्त कॉलनी, नेहरुनगर, मच्छे येथे 1 जानेवारी रोजी झालेली घरफोडी, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पिरनवाडी येथे झालेली घरफोडी याच टोळीने केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून नववर्षाच्या सुऊवातीला संपूर्ण शहर व उपनगरात या जोडगोळीने उच्छाद मांडला होता. त्यांना अटक करण्यात आली आहे.
एका दिवसात दोन चेनस्नॅचिंग
कृष्णा व नागराज या जोडगोळीने एका दिवसांत दोन चेनस्नॅचिंग केल्याची कबुली दिली आहे. 4 जानेवारी रोजी दुपारी बॉक्साईट रोडवरील साई मंदिरजवळ सखुबाई कांबळे (रा. टिचर्स कॉलनी) यांच्या गळ्यातील चेन पळविण्यात आली होती. त्याच दिवशी रात्री 8.30 वाजता चˆम्मानगर येथील जयश्री बेळगुंदीकर यांच्या गळ्यातील चेन मोटारसायकलवरून आलेल्या भामट्यांनी पळविली होती. हे दोन्ही गुन्हे याच जोडगोळीने केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
चैनीसाठी चोऱ्या
दोघे जण घराबाहेर उभे राहून टेहळणी करायचे तर दोघे जण घरात घुसून चोरी करायचे. चोरीत लुटलेला ऐवज विकून ते चैनी करत होते. यापैकी काही जणांना अंमलीपदार्थांचेही व्यसन जडले आहे. गांजाच्या नशेत गुन्ह्यासाठी ते बाहेर पडायचे. चोऱ्या, घरफोड्यांनंतर चैनीसाठी ते पैसे उधळायचे, अशी माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे.