Tarun Bharat

जॉन्सन अँड जॉन्सन पावडर बंद होणार

Advertisements

जॉन्सन अँड जॉन्सन या जगप्रसिद्ध कंपनीची बेबी टाल्कम पावडर नेणत्या वयात अंगाला लागली नाही असे बालक भारतात मध्यमवर्गीय समाजात तरी विरळा असेल. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात ही बेबी टाल्कम पावडर प्रसिद्ध आहे. मात्र, आता कंपनी या पावडरीचे उत्पादन बंद करणार आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये 2020 पासूनच या पावडरीची विक्री बंद आहे.

ही पावडर बंद करण्याचे कारणही अत्यंत गंभीर असेच आहे. या पावडरच्या उपयोगामुळे मोठेपणी कर्करोग होण्याचा धोका संभवतो किंवा धोका वाढतो, असा दावा करण्यात येत आहे. तशा प्रकारचे काही निष्कर्षही सर्वेक्षणांमधून काढण्यात आले आहेत. हे निष्कर्ष प्रसिद्ध झाल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून या पावडरीच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. कंपनीने मात्र या आरोपांना अफवा म्हणून गणले असून पावडर सुरक्षित असल्याचा दावा वारंवार केला आहे. तथापि, बऱयाचदा सार्वजनिक भावना किंवा पब्लिक परसेप्शन महत्त्वाचे ठरते. त्याला अनुसरून कंपनीने हा अप्रिय निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. टाल्कम हा एक प्रकारचा दगड असून तो खनिजाच्या स्वरुपात मिळतो. त्याचे अतिशय बारीक चूर्ण आणि त्याला सुवासिक करणारी काही रसायने अशी मिळून ही पावडर बनत होती. आता नवे संशोधन करण्यात आले असून मक्याच्या स्टार्चपासून चूर्ण तयार करण्यात आलेले आहे. हे चूर्ण टाल्कम पावडरपेक्षाही सुरक्षित असल्याने कंपनीने आता कॉर्नस्टार्च पावडर विकण्याची तयारी केलेली आहे.

error: Content is protected !!