मुलाचा निर्धार पाहून अचंबित व्हाल
एका विद्यार्थ्याने दोन्ही पाय नसतानाही स्वतःच्या शाळेच्या बास्केटबॉल टीममध्ये स्थान मिळवून जगभरातील क्रीडाप्रेमींना प्रेरित केले आहे. स्वतःच्या दिव्यांगत्वानंतरही जोशियाह जॉन्सन लहानपणापासून बास्केटबॉल खेळत आहे. बास्केटबॉल कोर्टवर 8 वीत शिकणाऱया विद्यार्थ्याची मेहनत अखेर फळली आहे. अमेरिकेच्या लुइसविले येथील मूर मीडिल स्कुलच्या टीममध्ये स्थान मिळविले आहे.
पायांशिवाय जन्माला आलेला जोशियाह जॉन्सनचा निर्धार अनेकांना अचंबित करणारा आहे. टीमची घोषणा झाल्यावर माझ्यासाठी सर्वकाही एका स्वप्नाप्रमाणे होते. प्रशिक्षकासमोर उत्साहित नसल्याचा अभिनय मी करू पाहत होतो. परंतु जेव्हा मी जिममध्ये गेलो तेव्हा मला माझा उत्साह लपविता आला नाही असे जोशियाहने म्हटले आहे.
जोशियाहसाठी बास्केटबॉल म्हणजे एक ध्यासाप्रमाणे असल्याचे उद्गार त्याचे मुख्य प्रशिक्षक डकन बॉयड यांनी काढले आहेत. बॉयड यांनी जेफरसन काउंटी पब्लिक स्कुलकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत जोशियाहला आम्ही सहानुभूतीमुळे टीममध्ये सामील केले असे नाही, तो प्रत्यक्षात टीममध्ये स्थान मिळविण्यास पात्र असल्याचे म्हटल्याचे दिसून येते. जोशियाहने बास्केटबॉल टीममध्ये स्थान मिळविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले होते.
जोशियाह 17 नोव्हेंबरला सीझनमधील स्वतःचा दुसरा गेम खेळला आहे. त्याने स्टाइल्स, रिबाउंड आणि असिस्टसह स्वतःचे अस्तित्व दाखवून दिले आहे. त्याला आता स्कोरिंग कॉलममध्ये स्थान मिळवायचे आहे. आठवीत शिकणाऱया जोशियाहमध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला आहे. माझे पाय नसल्याने माझ्या क्षमतेवर कुणी संशय व्यक्त करू नये. मी इतरांसारखाच माणूस असल्याचे मला दाखवून द्यायचे आहे असे जोशियाहचे म्हणणे आहे.