तालुका म. ए. समितीच्या बैठकीत आवाहन : झाडशहापूर येथे रिंगरोडविरोधात सोमवारी आंदोलन
प्रतिनिधी /बेळगाव
रिंगरोडविरोधात सोमवार दि. 23 रोजी झाडशहापूर येथे रास्तारोको करण्यात येणार आहे. रास्तारोकोमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला. रेल्वेओव्हरब्रिजजवळील मराठा मंदिर येथे ही बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते.
तालुक्यातील 32 गावांतील सुपीक जमिनीतून रिंगरोड करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी भूमीहीन होणार आहेत. त्याविरोधात तालुका म. ए. समितीच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात येत आहे. बेळगाव-खानापूर रोडवरील झाडशहापूर येथे रास्तारोको करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. याचबरोबर 29 जानेवारी रोजी हळदी-कुंकू समारंभ करण्यात येणार आहे. त्यासाठी महिला आणि कार्यकर्त्यांची कमिटी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई येथे 27 फेब्रुवारी रोजी अधिवेशनावेळी धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. त्या आंदोलनामध्ये प्रत्येक गावातील म. ए. समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यांनी गावपातळीवर बैठक घेऊन नावे द्यावीत, असे आवाहनही बैठकीत केले.
तालुका म. ए. समितीची नूतन कार्यकारिणी करण्यात येणार आहे. त्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातील एका व्यक्तीचे नाव 31 जानेवारीपर्यंत तालुका म. ए. समितीकडे दाखल करावे, असे ठरविण्यात आले. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, अॅड. सुधीर चव्हाण, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, एस. एल. चौगुले यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक अॅड. एम. जी. पाटील यांनी केले.
या बैठकीला आर. एम. चौगुले, आर. आय. पाटील, कृष्णा हुंदरे, रामचंद्र मोदगेकर, मनोहर संताजी यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.