सीमेला लागून असलेल्या शत्रूच्या तळांना करता येणार नष्ट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय सैन्यात स्वॉर्म ड्रोन सामील करण्यात आले आहेत. हे ड्रोन सैन्याला शत्रूच्या विरोधातील मोहिमांमध्ये सामर्थ्य प्राप्त करून देणार आहेत. विशेषकरून सीमांवर सैन्य शत्रूच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवण्यासह त्याचे तळही नष्ट करू शकणार आहे.
स्वॉर्म यंत्रणेचा जगभरात अलिकडील विविध संघर्षांमध्ये वापर झाल्याचे दिसून आले आहे. ड्रोन तंत्रज्ञान सैन्य मोहिमांमध्ये एक बळ वाढविणारे ठरले आहे. सीमांवर ड्रोनशी संबंधित घटनांमध्ये उल्लेखनीय वृद्धी झाल्याचे सैन्याने एका वक्तव्याद्वारे म्हटले आहे.
जगभरात अलिकडे झालेल्या विविध संघर्षांमध्ये विशेषकरून आर्मेनिया, अझरबैजान, सीरिया अन् सौदी अरेबियात तेलप्रकल्पांवरील हल्ले तसेच रशिया-युक्रेन युद्धाने ड्रोनचे महत्त्व अन् सामर्थ्य दाखवून दिले आहे. भूदळाच्या मोहिमांसाठी ड्रोनची विशेष गरज असल्याचे यामुळे कळून चुकले आहे.
स्वॉर्म ड्रोन सिस्टीममध्ये अनेक प्रकारची हवाईयानं असतात, जी आर्टिफिशियल इंटेलिजेन्सने युक्त असतात. शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवण्यासह शत्रूला नष्ट करण्यास ही यंत्रणा सक्षम आहे. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान सामील करण्यासाठी भारतीय सैन्याने दोन भारतीय स्टार्टअप कंपन्यांकडून ड्रोन्स खरेदी केले आहेत.