मनपाच्या महसूल विभागातील कर्मचाऱयांना टार्गेट : दिवसभरात 14 हजार मतदारांचे लिंक
प्रतिनिधी /बेळगाव
मतदार यादीला आधार ओळख क्रमांक जोडणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुटी रद्द करून मनपाच्या महसूल कर्मचाऱयांना आधार लिंकचे टार्गेट देण्यात आले आहे. दोन दिवसात 20 हजार मतदारांचे आधार लिंक करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे शनिवारी दिवसभरात 14 हजार मतदारांचे आधार क्रमांक जमा करण्यात आले.
मतदार क्रमांकाला आधार ओळख क्रमांक जोडण्याचा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने बजावला आहे. 46 दिवसात हे काम पूर्ण करण्याची सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना बजावली आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणूक विभागामार्फत आधार लिंक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महापालिकेच्या महसूल विभागातील सर्व कर्मचाऱयांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बीएलओंच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन आधार ओळखपत्राची प्रत किंवा क्रमांक घेऊन लिंक करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक आधार ओळखपत्र देण्यास टाळाटाळ करीत असल्याने आधार लिंक करण्यात अडचण निर्माण होत आहे. महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात तसेच महाविद्यालयांमध्ये याबाबत जागृती करून आधार लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चौथा शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुटी रद्द करून आधार लिंक करण्याची सूचना महापालिकेच्या महसूल विभागाच्या कर्मचाऱयांना केली होती. तसेच दोन दिवसात उत्तर आणि दक्षिण मतदार संघातील 20 हजार मतदारांचे आधार क्रमांक लिंक करण्याचा आदेश आयुक्तांनी बजावला होता. या कामाकडे दुर्लक्ष करणाऱया कर्मचाऱयांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा देखील दिला आहे. त्यामुळे महसूल विभागाचे कर्मचारी दोन दिवस सुटीच्या दिवशी देखील आधार लिंकच्या कामात व्यस्त आहेत. शनिवारी दिवसभरात 14 हजार मतदारांचे आधार क्रमांक जमा केले असून, लिंक करण्याचे काम सुरू आहे. रविवारीही महसूल विभागाचे कर्मचारी मतदारांच्या घरोघरी जाऊन आधार ओळखपत्र व मतदार ओळखपत्राची प्रत घेत होते. त्यामुळे या आठवडय़ातील मनपा कर्मचाऱयांची सुटी बुडाली आहे.