वृत्तसंस्था/ अम्मान (जॉर्डन)
वरिष्ठांचा भारतीय महिला फुटबॉल संघ सध्या जॉर्डनच्या दौऱयावर असून उभय संघांमध्ये मित्रत्वाचे दोन आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळविले जाणार आहेत. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान जॉर्डनने भारतीय महिला फुटबॉल संघाचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
2024 साली होणाऱया पॅरिस ऑलिम्पिकसाठी पुढील महिन्यात आशियाई पात्रफेरी गट-1 स्पर्धा खेळविली जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय महिला संघाला सराव व्हावा, यासाठी भारतीय फुटबॉल फेडरेशनने हा दौरा आयोजित केला आहे. आशियाई पात्रफेरी राऊंड-1 महिलांची फुटबॉल स्पर्धा पुढील महिन्यात किर्गी प्रजासत्ताक येथे खेळविली जाणार आहे.
रविवारी झालेल्या मित्रत्वाच्या पहिल्या सामन्यात यजमान जॉर्डनने पहिल्या पंधरा दिवसांच्या कालावधीतच 2 गोल नोंदविले. जॉर्डन संघातील खेळाडूंनी दिलेल्या पासवर भारतीय संघातील रितू राणीने नजरचुकीने चेंडू आपल्याच संघाच्या गोलपोस्टमध्ये धाडल्याने जॉर्डनला हा बोगस गोल मिळाला. भारताचा एकमेव गोल सामना संपण्यास 16 मिनिटे बाकी असताना रेणुने नोंदविला. आता उभय संघातील दुसरा मित्रत्वाचा सामना याच ठिकाणी बुधवारी खेळविला जाणार आहे.