Tarun Bharat

जॉर्डन फुटबॉल संघाची भारतावर मात

वृत्तसंस्था/ डोहा

शनिवारी येथे झालेल्या मित्रत्वाच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात जॉर्डनने भारताचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. हा सामना कतार एससी स्टेडियमवर खेळविला गेला.

या सामन्याला दोन्ही संघाकडून सावध सुरूवात झाली. उभय संघ स्थिर होण्यासाठी प्रयत्न करीत होते. पहिल्या दहा मिनिटांच्या कालावधीत जॉर्डनला फ्री कीक मिळाली पण त्यांच्या मुसाचा फटका भारतीय गोलपोस्टच्या बाहेरून गेला. 20 व्या मिनिटाला भारतीय बचावफळीवर नियंत्रण ठेवण्याचा जॉर्डनच्या हमझाचा  प्रयत्न सुरू होता. दरम्यान भारताच्या गुरप्रितसिंग संधूने चेंडूवर नियंत्रण मिळवीत जॉर्डनला गोल करण्यापासून रोखले. मध्यंतराला 15 मिनिटे बाकी असताना भारताच्या मानवीर सिंगने डाव्या बगलेतून जॉर्डनच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली पण त्याला चेंडूवर नियंत्रण राखता आले नाही. मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. प्रशिक्षक स्टिमॅक यांनी उत्तरार्धातील खेळाला प्रारंभ झाल्यानंतर भारतीय संघात दोन बदल केले. मानवीर सिंग आणि अनिरूद्ध थापा यांच्या जागी कुरुनियन आणि यासीर मोहम्मद यांना मैदानात उतरविले. उत्तरार्धातील खेळाच्या तिसऱया मिनिटाला सुभाशिष बोसच्या दिलेल्या पासवर सुनील छत्रीला गोल नोंदविता आला नाही. 53 व्या मिनिटाला भारताला कॉर्नर मिळाला पण जॉर्डनच्या बचावफळीने भारताचे हे आक्रमण रोखले. 61 व्या मिनिटाला भारताला फ्री कीक मिळाली. पण बदली खेळाडू यासीरचा फटका जॉर्डनच्या गोलपोस्टवरून गेला. 72 व्या मिनिटाला जॉर्डनला फ्री कीक मिळाली. कर्णधार सुलेमानचा हा फटका भारतीय गोलपोस्टच्या बाहेरून गेल्याने जॉर्डनला आपले खाते उघडता आले नाही. निर्धारित वेळेतील शेवटची 15 मिनिटे बाकी असताना भारतीय संघात पुन्हा फेरबदल करण्यात आले. सुनील छेत्री आणि ग्लेन मार्टिन्स यांच्या जागी सुरेश व बेंडॉन फर्नांडिस यांना मैदानात उतरविले. 73 व्या मिनिटाला जॉर्डनचे खाते अबु अमाराने उघडले. अहमद सालेहने दिलेल्या पासवर अबु अमाराने हा गोल नोंदविला. जॉर्डनचा दुसरा गोल सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना नोंदविला गेला. अबु अमाराने दिलेल्या पासवर अबु झेरिकने जॉर्डनचा दुसरा गोल नेंदवून भारताचे आव्हान संपुष्टात आणले.

Related Stories

भारताचा द.आफ्रिकेवर 54 धावांनी विजय

Patil_p

जपान टेनिस स्पर्धेतून किर्गिओस निवृत्त

Patil_p

वेल्स-अल्बेनिया सामना बरोबरीत

Patil_p

लेवान्डोस्की बुंदेस्लिगा हंगामातील सर्वोत्तम खेळाडू

Patil_p

तेजिंदरपाल सिंग तूर राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर

Patil_p

महिलांच्या तिरंगी मालिकेसाठी ईसीबी प्रयत्नशील

Patil_p