क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा शरीरसौष्टव संघटना व एकता युवक मंडळ नवरात्रोत्सव कांगले गल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ज्यु. मि. बेळगाव टॉप टेन जिल्हास्तरीय शरीरसौष्टव स्पर्धा व मोरया क्लासिक जिल्हास्तरीय शरीरसौष्टव स्पर्धा, मोरया श्री टॉप टेन मोरया जिम मर्यादित शरीरसौष्टव स्पर्धेचे आयोजन शनिवार दि. 1 ऑक्टोबर रोजी हेमू कलानी चौक, शनि मंदिर बेळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा आयबीबीएफ मुंबईच्या मान्यतेनुसार 55 किलो गट, 60, 65, 70, 75 व 75 किलोवरील अशा सहा वजन गटात घेण्यात येणार आहे. या गटातील प्रत्येक पहिल्या पाच विजेत्यांना 2500, 2000, 1500, चौथ्या व पाचवा क्रमांकासाठी प्रत्येकी 1000 रूपये रोख, पदके, प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून तर किताब विजेत्या स्पर्धकाला रोख 5 हजार रूपये, मानाचा किताब, चषक व प्रमाणपत्र तर उत्कृष्ट पोझरला 2000 रू. रोख व चषक प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.
ज्युनियर मि. बेळगाव स्पर्धा 21 वर्षाखालील स्पर्धकांसाठी असून, या स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे 3 हजार, 2 हजार, 1500 व चौथ्या व पाचव्या क्रमांकासाठी प्रत्येकी 1000 रूपये देण्यात येणार आहे. या गटातील सर्व स्पर्धकांनी दहावीचे प्रमाणपत्र, जन्मदाखला व आधारकार्ड किंवा ड्रायव्हींग लायसन्स आणणे सक्तीचे आहे. सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना या स्पर्धेत प्रवेश दिला जाणार नाही, याची नोंद स्पर्धकांनी घ्यावी. इच्छुक स्पर्धकांनी आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्दण्णावर, सुनील राऊत, गौरांग गेंजी, सतीश कांबळे यांच्याशी संपर्क साधावा. दुपारी 2 ते 4 या वेळेत खेळाडूंची वजने घेतली जाणार आहेत. त्यानंतर स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.