शिपाई म्हणून भरती होऊन सुभेदार मेजर पदावरून निवृत्तीपर्यंत एकत्रच मजल
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
28 वर्षांपूर्वी देशसेवा करण्यासाठी एकाच दिवशी शिपाई म्हणून भरती झालेले जवान जिद्द व चिकाटीच्या जोरावर सुभेदार-मेजर अधिकारी बनले. 28 वर्षांनी निवृत्त झालेल्या या अधिकाऱयांचे कंग्राळी बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने बेळगाव रेल्वे स्थानकावर शाही स्वागत करण्यात आले.
बेळगाव रेल्वे स्थानकावर त्यांचे आगमन होताच छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान, भारतमाता की जय अशा घोषणा देऊन परिसर शिवमय करून सोडला.
या निवृत्त अधिकाऱयांमध्ये प्रदीप मिरजकर (मारीहाळ), ईराप्पा कुंभार (बागेवाडी), उमेश कुंद्री (मच्छे), बाळासाहेब निर्मळे (गांधीनगर) हे सर्वजण 22 मे 1994 रोजी बेळगाव येथील किल्ला सेंटरमधून भरती झाले. त्यानंतर त्यांना अहमदनगर येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. 6 महिने प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शिपाई म्हणून देशसेवेस प्रारंभ केला.
या 28 वर्षांच्या काळात सूरतगड, पठाणकोट, राष्ट्रीय रायफल्स आठ आर आर आदी ठिकाणी त्यांनी प्रामाणिक सेवा बजावली. या सेवेची पोचपावती म्हणून या चौघांचीही सुभेदार-मेजरपदी बढती झाली. या काळात भारतमातेची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले, असेही त्यांनी सांगितले.
भरती प्रशिक्षण ते निवृत्त अहमदनगर सेंटरमधूनच
या चारही साथीदारांची 28 वर्षांपूर्वी शिपाई म्हणून भरती झाल्यावर अहमदनगर सेंटरमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. देशसेवा करत सुभेदार-मेजर पदापर्यंत मजल मारून 28 वर्षांनंतर एकाच दिवशी सर्वजण निवृत्त होण्याचा योगायोग आम्ही आयुष्यभर विसरणार नाही, असे भावूक होऊन त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी सांगितले.
बेळगाव रेल्वे स्टेशनवर कंग्राळी बुद्रुक गावचे सुपुत्र व निवृत्त जवान नितीन पवार, श्री गणेश मंदिर सेवा मंडळाचे कार्यकर्ते राजू चिखलकर, गजानन चिखलकर, सागर चिखलकर, उमेश कामुले, महादेव पाटील व ग्रामस्थांच्यावतीने भगवे फेटे बांधून व हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कारानंतर त्यांनी कृतज्ञता व्यक्त करून आजच्या तरुण पिढीने भारतीय सेनेमध्ये दाखल होऊन उत्तमप्रकारे देशसेवा बजावून आपले भावी जीवन सुजलाम-सुफलाम करुन घेण्याचे त्यांनी आवाहन केले.