ऑनलाईन टीम / काबुल :
अफगाणिस्तानची राजधानी काबुल (Kabul) आज तीन आत्मघातकी हल्ल्यांनी हादरली. शिया हजारा समुदायाला लक्ष्य करत हल्लेखोरांनी काबुलमधील माध्यमिक शाळांमध्ये तीन बॉम्बस्फोट (bomb blast) घडवून आणले. या स्फोटात 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, काही विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. जखमी मुलांना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खलिद जर्दन या काबुल कमांडरच्या प्रवक्त्यानं यासंदर्भात माहिती दिली आहे.
खलिद जर्दन यांनी दिलेल्या माहितीनुसार, काबुल पश्चिमेच्या भागातील शाळेमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आले. पहिला स्फोट मुमताज एज्युकेशनल सेंटरजवळ झाला. दुसरा स्फोट अब्दुल रहीम शहीद हायस्कूलच्या समोर झाला. तिसरा स्फोटही याच शाळेच्या परिसरात विद्यार्थी शाळेतून बाहेर पडत असताना झाला. या स्फोटांमध्ये 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, काही विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. ज्या शाळेमध्ये बॉम्बस्फोट झाले, त्या परिसरात शिया हजारा समुदाय मोठय़ा संख्येने आहे. इस्लामिक कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर हा समुदाय आहे, अशी देखील माहिती आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.
तालिबान सत्तेत आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक स्टेट सक्रिय झालं आहे. दहशतवादी संघटना शिया हजारा समुदायाला निशाणा बनवत आहेत. शिया मुस्लीम समुदायाच्या मशिदीवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे इस्लामिक स्टेटकडून हल्ले झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.