चालक-वाहक जखमी, सुदैवाने प्रवासी नसल्याने अनर्थ टळला
प्रतिनिधी /पणजी
पणजी-हरमल मार्गावरील कदंब बसला पर्वरी येथे अपघात झाला असून त्यात प्रवासी नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तथापि बसचे चालक-वाहकास जबर दुखापत झाली असून त्यांना बांबोळी येथील गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कदंब महामंडळाची जीए 03 एक्स 0363 या क्रमांकाची बस पणजी येथून पर्वरी डेपोत जात असताना हा अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बसने प्रथम रस्त्यावर उभे असलेल्या चार चाकी वाहनास धडक दिली. नंतर ती बस झाडावर आदळली. सकाळी गर्दीच्या वेळेस हा अपघात झाल्याने काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली. मुकेश शिरगावकर असे चालकाचे नाव असून सुनील पोरखणकर असे वाहकाचे नाव आहे. प्रज्योत बर्वे हा कदंबचा कर्मचारी बसमध्ये होता.
हरमल-पेडणे येथून आलेली सदर बस पणजी येथे बसस्थानकावर सर्व प्रवाशांना उतरवून पर्वरी येथील डेपोत जात होती. त्यावेळी हा अपघात घडला. बसमध्ये जर प्रवासी असते तर मोठा अनर्थ घडला असता. बसची धडक एवढी मोठी होती की तिच्या चालकाच्या केबीनचा चेंदामेंदा झाला आहे. बसचे माठे नुकसान झाले आहे.