डिजिटल सीरिजमध्ये काम करतेय अभिनेत्री
बॉलिवूड अभिनेत्री काजोल लवकरच ओटीटीवर डिजिटल सीरिजद्वारे पदार्पण करणार आहे. ओटीटीवर एक कलाकार स्वतःच्या क्षमतांसह चांगल्याप्रकारे काम करू शकतो असे काजोलने म्हटले आहे. नव्या गोष्टी आजमावणे नेहमीच एक आव्हान राहिले आहे, परंतु मला आव्हाने पसंत आहेत. डिजिटल सीरिजची मी मोठी चाहती असून त्यांची संकल्पना नेहमीच रंजक असते. आर्या आणि रुद्र या सीरिज पाहिल्यावर माझ्या ओटीटी पदार्पणासाठी डिस्ने हॉटस्टारपेक्षा अधिक चांलला पर्याय नसल्याचे मला माहिती होते असे काजोल म्हणाली.
काजोलसारखी दिग्गज अभिनेत्री आमच्यासोबत जोडली जातेय याचा आम्हाला आनंद आहे. काजोलसोबत आम्ही प्रेम, भावना आणि कुटुंबाची एक अनोखी कहाणी सादर करत आहोत असे डिस्ने हॉटस्टारचे कंटेंट प्रमुख गौरव बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
काजोल यापूर्वी तन्वी आझमी आणि मिथिला पालकर यांच्यासोबत ‘त्रिभंग’मध्ये दिसून आली होती. अभिनेत्री याचबरोबर विशाल जेठवा आणि आहना कुमरा यांच्यासोबत ‘सलाम वेंकी’मध्ये दिसून येणार आहे. तसेच तिला ऑस्कर कमिटीचे सदस्यत्व मिळाले आहे.