प्रतिनिधी /फोंडा
राजीव गांधी कला मंदिर फोंडा आयोजित स्व. किशोरीताई हळदणकर स्मृती आठवी अखिल गोवा महिला संगीत नाटय़ स्पर्धा 8 ते 28 डिसेंबर या कालावधीत कला मंदिरच्या मास्टर दत्ताराम सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. कला मंदिरच्या सदस्य सचिव स्वाती दळवी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी कला मंदिरचे कार्यक्रम अधिकारी सुनील केरकर व स्पर्धेच्या संयोजिका किर्ती उमर्ये हे उपस्थित होते.
स्पर्धेत गोव्यातील कुठल्याही हौशी नाटय़ संस्थेला भाग घेता येईल. मात्र एका संस्थेला एकच प्रवेशिका दाखल करण्याची मुभा राहील. स्पर्धेसाठी मराठी किंवा कोकणी भाषेतील नाटय़संहिता असावी. त्यासाठी पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक व प्रायोगिक यापैकी कुठल्याही प्रकारचे नाटक निवडता येईल. नाटय़प्रयोगात रंगमंचावरील सर्व कलाकार महिला असणे आवश्यक आहे.
एखाद्या संस्थेने स्पर्धेसाठी नवीन नाटक लिहून सादर केल्यास व अशा नाटकांची एकूण संख्या तीन किंवा त्याहून अधिक असल्यास नाटय़लेखनासाठी प्रथम व द्वितीय अशी दोन बक्षिसे देण्यात येतील. मागील स्पर्धेत सादर केलेले नाटक त्याच संस्थेला पुन्हा सादर करता येणार नाही. रंगमंचावरील भुमिका महिलांसाठी असल्यातरी दिग्दर्शन, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, संगीत, नेपथ्य, वेषभूषा, रंगभूषा या तांत्रिक बाबी महिला कलाकार किंवा तंत्रज्ञाबरोबर पुरुष कलाकार हाताळू शकतात. स्पर्धा केवळ गोमंतकीय संस्था व कलाकारांसाठी असल्याने गोव्याबाहेरील संस्था व कलाकारांना त्यात भाग घेता येणार नाही. तसेच एका कलाकाराला एकापेक्षा जास्त नाटकात भूमिका करता येणार नाही.
सर्वोत्कृष्ट नाटकासाठी प्रथम रु. 60,000, द्वितीय रु. 50,000, तृतीय रु. 40,000 तसेच उत्तेजनार्थ प्रथम रु. 25,000, द्वितीय रु. 20,000, तृतीय रु. 15,000 याशिवाय अन्य वैयक्तिक पारितोषिके देण्यात येतील. प्रथम नावनोंदणी करणाऱया केवळ 15 संस्थांना स्पर्धेत प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश अर्ज 20 ऑक्टो. पासून कला मंदिरच्या कार्यालयात उपलब्ध करण्यात येतील, अशी माहिती किर्ती उमर्ये यांनी दिली.