प्रतिनिधी / शिरोडा
शिरोडा येथील कला सागर सांस्कृतिक केंद्राचा 36 वा वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी संगीत शिक्षक व संस्थेच्या सभासदांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सरपंच पल्लवी मेघनाथ शिरोडकर या उपस्थित होत्या. त्यांच्याहस्ते संस्थेचे 18 सभासद व 4 संगीत शिक्षकांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचा एक भाग म्हणून गावातील युवा संवादिनी वादक भावेश संतोष नाईक यांचे संवादिनी वादन झाले. त्यांना तबल्यावर ऋषिकेश नाईक यांनी साथसंगत केली. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सरपंच पल्लवी शिरोडकर यांनी संस्थेच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याबद्दल प्रशंसा केली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष नाईक यांनी केले.