Tarun Bharat

कालिदासाचे मेघदूत…एक खंडकाव्य (15)

Advertisements

मागील श्लोकात चातक पक्षाचा उल्लेख पाहिला. चातकाला जमिनीवर बसून पाणी पिता येत नाही. तो मेघातून पडणारे पाणी वरचेवर टिपून घेतो, असा कविसंकेत आहे. तसेच ‘सिद्ध’ शब्दाचाही उल्लेख आला आहे. सिद्ध‌ हे देवयोनिविशेष आहेत. ह्यांना अष्टसिद्धी प्राप्त असतात. ‘अणिमा महिमा चैन गरिमा लघिमा तथा। प्राप्तीः प्राकाम्यमीशित्वं वशित्वं चाष्ट सिद्धयः।।’ अशा आठ सिद्धी सांगितल्या आहेत. सिद्धांचे वैशिष्टय़ शुद्धत्व आणि पावित्र्य होय. सिद्ध हे त्यागी नाहीत, तर भोगी असल्याने त्यांच्या स्त्रियाही असतात.

म्हणून येथे यक्षाच्या मनात एक भीती असते, ती तो मेघाला सांगताना म्हणतो……

उत्पश्यामि द्रुतमपि सखे मत्प्रीयार्थं यियासोः

कालक्षेपं ककुभसुरभौ पर्वते पर्वते ते।

शुक्लापाङ्गैःसजलनयनैः स्वागतीकृत्य केकाः।

प्रत्युद्यातः कथमपि भवान्गन्तुमाशु व्यवस्येत्।।22।।

अर्थः- मित्रा, माझे प्रिय करण्यासाठी (माझ्या प्रियेला निरोप देण्यासाठी) लवकर जाण्याची इच्छा असूनही तुझा कुडय़ाच्या फुलांनी सुगंधित झालेल्या प्रत्येक पर्वतावर तुझा वेळ वाया जाईल, अशी मला भीती वाटते. तरीही आनंदाश्रूनी भरलेल्या डोळय़ांनी मोर आपल्या केकांनी(मोराचा टाहो) स्वागत करून तुझा सत्कार करतील. म्हणून कसेही करून तू लवकर पुढे निघून जा.

वरील श्लोकात अप्रस्तुतप्रशंसा अलंकार वापरलाय.

पुढे नर्मदेच्या काठाकाठाने जाताना पुष्कळ पर्वत ओलांडल्यावर दशार्ण देश लागेल. त्या देशात शिरताना तो देश कसा दिसेल हे यक्ष मेघाला सांगतो…..

पाण्डुच्छायोपवनवृतयः केतकैः सूचिभिन्नै-

र्नीडारम्भै र्गहबलिभुजामाकुलग्रामचैत्याः।

त्वय्यासन्ने परिणतफलश्यामजम्बूवनान्ताः

संपत्स्यन्ते कतिपयदिनस्थायिहंसा दशार्णाः।।23।।

अर्थः- तू नजीक आलास की, दशार्ण नावाचा देश लागेल. तेथील केवडय़ाचे वन अगदी फुलून जाऊन सर्व कुंपणांना शुभ्रता प्राप्त होईल. घरटी बांधण्यात गढलेल्या कावळय़ांनी वड, पिंपळ वगैरे वृक्ष गजबजून जातील. वनातील जांभळे पिकल्यामुळे जांभळीची वने काळी होतील. त्यामुळे काही दिवस हंसही तिथे राहिलेले दिसतील.

श्लोकातील ‘गृहबलिभुजाम्’ शब्दाचा अर्थ घरातून टाकलेले दाणे वगैरे खाणारे कावळे इ.पक्षी. ‘दशार्ण’ म्हणजे ज्याला दहा ऋण म्हणजे कोट आहेत, किंवा ज्यात दहा ‘ऋण’ म्हणजे नद्या वहात आहेत असा देश. हल्लीचा छत्तीसगड म्हणजेच दशार्ण असे काहींचे मत आहे. तर भारताचार्य चिंतामणराव वैद्य दशार्ण म्हणजे भेलसा प्रांत असे सांगतात.

वरील श्लोकात स्वभावोक्ती अलंकार आहे.

Related Stories

बिहारचे रण

Patil_p

स्वरसम्राज्ञी

Patil_p

प्रदूषणाच्या जहरी विळख्यात दिल्ली

Amit Kulkarni

कोरोनाच्या निमित्ताने विज्ञानाला आक्हान व आवाहन

Patil_p

कोविडकाळातील ‘हरवलेले’, ‘दुरावलेले’ शिक्षण

Patil_p

पोटनिवडणुकीचा बदलता पॅटर्न

Patil_p
error: Content is protected !!