Tarun Bharat

कालिदासाचे मेघदूत…एक खंडकाव्य

कालिदासाचे मेघदूत आणि त्यावरील टीका वाचताना लक्षात येते की, अनेक टीकाकारांनी त्यातल्या प्रत्येक शब्दाचा कीस पाडला आहे. मागील श्लोकावर टीका करणाऱयांची नावे जरी वाचली तरी त्यांच्या नावांचेच दडपण येते. उदा.सारोद्धारिणी, सरस्वतीतीर्थ, सुमतिविजय,वल्लभ वगैरे. पण बहुतेक श्लोकांवरील मल्लिनाथाने केलेली टीका जास्त ग्राह्य किंवा संयुक्तिक मानली जाते असे दिसते. आजही आपल्या भाषेमध्ये एखाद्याने ‘मल्लिनाथी केली’ असा वाप्प्रचार वापरला जातो. इतका तो संस्कृत वाङ्मयाचा अभ्यासू आणि महत्त्वाचा टीकाकार होऊन गेला.

ह्या सर्वांमुळे आपल्याला मूळ श्लोकात कोणते शब्द असले पाहिजेत किंवा नसले पाहिजेत ह्याबद्दलची माहिती मिळते. त्याचबरोबर एखाद्या शब्दातील एखादे अक्षर बदलल्याने त्या शब्दाचा… किंबहुना त्या ओळीचाच पूर्ण अर्थही कसा बदलतो आणि अधिक चपखल वाटतो हेही समजते. उदा. अध्वक्लान्तम् ऐवजी अध्वश्रान्तम्, चित्रकूटः ऐवजी आम्रकूटः इत्यादी शब्द वगैरे. असो. आता पुढील श्लोक पाहू.

स्थित्वा तस्मिन्वनचरवधूभुङ्क्तकुञ्जे मुहूर्तं

तोयोत्सर्गद्रुततरगतिस्तत्परं वर्त्म तीर्णः।

   रेवां द्रक्ष्यस्यु पलविषये विन्ध्यपादे विशीर्णां

 भक्तिच्छेदैरिव विरचितां भूतिमङ्गे गजस्य ।।19।।

अर्थः- जंगलात राहणाऱया लोकांच्या स्त्रियांनी उपभोग घेतलेले लताकुंज असलेल्या त्या पर्वतावर थोडा वेळ थांबून नंतर जलवृष्टीमुळे जलदगतीने त्या पर्वताची हद्द ओलांडून गेल्यावर पाषाणाच्या योगाने उंचसखल झालेल्या विंध्य पर्वताच्या पायथ्याशी पसरलेल्या आणि हत्तीच्या शरीरावर चित्रविचित्र पट्टय़ांनी काढलेल्या ऐश्वर्याप्रमाणे असलेल्या नर्मदा नदीला तू पाहशील. म्हणजेच नर्मदा नदी तुला दिसेल. वरील श्लोकात ‘वनचरवधू’ म्हणजे वनात राहणारे कातकरी, भिल्ल इ.आदिवासी लोकांच्या स्त्रिया. तर मुहूर्त म्हणजे ‘मंगल वेळ’ असा नसून ‘थोडा वेळ’ असा अर्थ आहे. मागील श्लोकात आम्रकूटाच्या शिखराचा, तर ह्या श्लोकात विंध्य पर्वताच्या पायथ्याचा उल्लेख आहे. ‘वर्त्म’ म्हणजे हद्द. आम्रकूट ते विंध्य पर्वतापर्यंतची हद्द किंवा सीमा. नर्मदा नदीचा मार्ग ह्या दोन पर्वतातील अतिशय खडकाळ अशा डोंगरातून गेल्याने तो प्रवाह विखुरलेला किंवा फाटलेला दिसतो. म्हणून तो फाटल्यासारखा, चित्रविचित्र पट्टय़ांसारखा दिसतो, याची कल्पना येण्यासाठी ‘विशीर्णा’ हा शब्द वापरलाय. हे दृश्य आकाशातून पाहिल्यावर असेच दिसत असावे. म्हणूनच कविलाही तसेच दिसले ! म्हणूनच त्याने तसे वर्णन केले असणार.

Related Stories

बोलविता धनी वेगळाच !

Patil_p

वाढत्या उष्म्याबरोबरच राजकीय वातावरण

Amit Kulkarni

कोळसामुक्त वीजनिर्मिती

Amit Kulkarni

श्रीकृष्ण स्तुती

Patil_p

काय आले, काय गेले (1)

Patil_p

शिक्षणाचा खादाड बाजार!

Patil_p