यक्ष मेघाला दशार्ण देशात गेल्यावर तिथे काय काय दिसेल हे इतक्मया बारीकसारीक तपशीलांसह सांगतो की, ह्यावरून कालिदासाने ह्या प्रदेशाचा पूर्वी प्रवास केला असला पाहिजे असे वाटते आणि त्याने बारकाईने केलेले निरीक्षण आपल्याला चकित केल्याशिवाय रहात नाही. त्यानंतर दशार्ण देशात शिरल्यावर मेघाला कोणते सौख्य अनुभवायला मिळेल हे त्याने पुढील श्लोकात सांगितले आहे.
तेषां दिक्षु प्रथितविदिशालक्षणां राजधानीं
गत्वा सद्यः फलमविकलं कामुकत्वस्य लब्धा।
तीरोपान्तस्तनितसुभगं पास्यसि स्वादु यस्मा-
त्सभ्रूभङ्गं सुखमिव पयो वेत्रवत्याश्चलोर्मि।।24।।
अर्थः-त्या दशार्ण देशांच्या सर्वत्र ‘विदिशा’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या राजधानीला गेल्यावर तू ताबडतोब स्त्रीविषयक विलासाचे संपूर्ण फळ प्राप्त करशील. कारण भुवई वक्र केलेल्या मुखाप्रमाणे(अधराप्रमाणे) वेत्रवती नदीचे(अलीकडची बटवा नदी) लाटांमुळे चंचल असलेले व काठावरील तुझ्या गडगडण्यामुळे सुंदर दिसणारे मधुर पाणी तू प्राशन करशील. ह्या श्लोकात शृंगाररसाचे दर्शन आपल्याला घडते. येणारा इथे शृंगारोत्सुक पुरुष कल्पून वेत्रवती नदी ही एक विलासिनी स्त्री कल्पीली आहे. विलासी पुरुषाला इतर सुखापेक्षा अधरामृतप्राशनातच सुख वाटते. त्याप्रमाणे मेघाला वेत्रवती नदीचे जल प्राशन करण्यातच सुखसर्वस्व मिळते असे कालिदासाने वर्णन केले आहे. ‘विदिशा’ शहरालाही कोणी ‘भेलसा’ म्हणतात. तर वेत्रवती म्हणजे हल्लीची बटवा नदी होय. ती विंध्य पर्वताच्या उत्तरेला उगम पावते. माळवा प्रांतातून वहात जाऊन यमुना नदीला मिळते. ‘चलोर्मि’ म्हणजे लाटांमुळे चंचल दिसणारे.
पुढील श्लोकही शृंगाररसाचे वर्णन करणारा आहे. विलासिनी स्त्रीला आपल्या प्रियकराचा स्पर्श होताच तिच्या अंगावर रोमांच उभे राहतात हे सांगण्यासाठी कविने कदंबवृक्षाला आलेल्या फुलांचा कल्पकतेने वापर केला आहे. तो श्लोक असा–
नीचैराख्यंगिरिमधिवसेस्तत्र विश्रामहेतो-
स्त्वत्संपर्कात्पुलकितमिव प्रौढपुष्पैः कदम्बैः।
याः पण्यस्त्रीरतीपरिमलोद्गारिभिर्नागराणा-
मुद्दामानि प्रथयति शिलावेश्मभिर्यौवनानि।।25।।
अर्थः- तेथे (त्या विदिशानगरीसमीप) विश्रांती घेण्यासाठी पूर्ण फुले उमललेली असलेल्या कदंब वृक्षामुळे तुझ्या स्पर्शाने जणू काय रोमांच आल्याप्रमाणे दिसणाऱया ‘नीचैः’ नावाच्या पर्वतावर वस्ती कर. तो (नीचैःपर्वत) वारांगनांचा रतिपरिमल दरवळणाऱया गुहांच्या योगाने त्या नगरीतील लोकांचे बेफाम तारूण्य प्रकट करीत असतो.