Tarun Bharat

कालिदासाचे मेघदूत…एक खंडकाव्य (35)

Advertisements

विरही जनांच्या मनात भावनांचा जो समुद्र उचंबळत असतो, त्याचे गोड वर्णन ‘मेघा’इतके अन्यत्र क्वचितच सापडेल. नळराजाला दूत म्हणून राजहंस सापडला, पण रामगिरीवर आश्रयाला आलेल्या यक्षाला मात्र ‘धूमज्योतिः सलिलमरुता’ नी बनलेला अचेतन असा मेघच दूत म्हणून सापडला. कालिदासाच्या किमयेमुळे तो कधी आपल्याला श्रीकृष्णासारखा, कधी नीलकंठ शंकरासारखा दिसतो. एवढेच नव्हे तर उज्जैनी, कुरुक्षेत्र, कैलास वगैरे ठिकाणांहून तो अशा अद्भूत स्थळी जातो की, तिथे फक्त आनंदाश्रू, प्रेमकलह यौवनच दिसू शकते. दूत जसा काव्यमय आहे, तसेच यक्षाच्या विरहाचे कारणही!….तर असा हा मेघदूत मजल दरमजल करीत अखेर अलकानगरीपर्यंत येऊन पोचतो आणि मेघदूत काव्याचा दुसरा भाग अर्थात उत्तरमेघ सुरू होतो….

विद्युत्वन्तं ललितवनिताः सेन्दचापं सचित्रा

संगीताय प्रहतमुरजाः स्नग्धिगम्भीरघोषम्।

अन्तस्तोयं मणिमयभुवस्तुङ्गमभ्रंलिहाग्राः

प्रवासाला सुरुवात तुलयितुमलं यंत्र तैस्तैर्विशेषैः।।1।।

अर्थः- तिथे अलका नगरीत सुंदर स्त्रिया असलेले, चित्रांनी सुशोभित केलेले, संगीतासाठी मृदुंगवादन चालणारे, रत्नजडित जमिनी असणारे, गगनचुंबी शिखरे असणारे प्रासादतुल्य वाडे आहेत. जसे तू विजेने युक्त आहेस, इंद्रधनुष्याने युक्त आहेस,(मृदंगाप्रमाणे) मधुर आणि गंभीर आवाज करणारा आहेस, तू जलाने युक्त आहेस आणि तूही (गगनचुंबी इमारती प्रमाणे) उंच आकाशात रहाणारा आहेस, तशी तुझ्याशी सर्व बाबतीत बरोबरी करणारी अलकानगरी आहे. इथे पहिल्याच श्लोकात अलका नगरीची भव्यता, समृद्धता, रसिकता, श्रीमंती कालिदासाने सांगितली आहे. एकूण सलग बारा श्लोकांत अलका नगरीचे वर्णन कालिदासाने रंगवून केले आहे.

हस्ते लीलाकमलमलके बालकुन्दानुविद्धं

नीता लोध्रप्रसवरजसा पाण्डुतामानने श्रीः।

चूडापाशे नवकुरबकं चालु कर्णे शिरीषम्

सीमन्ते च त्वदुपगमजं यत्र नीपं वधूनाम्।।2।।

अर्थः- तिथे अलका नगरीत स्त्रियांच्या हातात कमळे असतात, केसांत कुंदपुष्पांचे घोस माळलेले असतात, त्या स्त्रिया आपल्या मुखाला लोध्रपुष्पांचे(पांढ-या रंगांची, लांब केसरं असणारी सुवासिक फुले) परागकण (मूखचूर्ण अर्थात फेस पावडर)लावतात. वेणीत कोरांटीची फुले घालतात, कानात शिरीषपुष्पे घालतात, भांगात पावसाच्या आरंभी उगवणारी कदंबपुष्पे धारण करतात.

म्हणजेच अलका नगरीतील स्त्रियांचा साजशृंगार नैसर्गिक फुलांचा केलेला दिसतो.

वरील श्लोकांत अप्रस्तुतप्रशंसा आणि भाविक अलंकार आहेत.

Related Stories

आपुल्या करूनि सप्तधा मूर्ति

Patil_p

सत्तांतराचे वारे

Patil_p

ज्याचा अवगुण झडेना !तो पाषाणाहून उणा !!

Patil_p

निवडुंगी ‘प्रथा’ आणि अव्यक्त ‘व्यथा’

Amit Kulkarni

नेतृत्वबदल रोखण्यासाठी दबावतंत्र

Amit Kulkarni

मान्सून ट्रेंड बदलतोय?

Patil_p
error: Content is protected !!