Tarun Bharat

कालिदासाचे मेघदूत..एक खंडकाव्य (57)

Advertisements

मागील श्लोकात आपण पाहिले की, यक्ष मेघाला आपले बंधुकार्य समजून आपला संदेश पत्नीपर्यंत पोचवण्यासाठी प्रार्थना करतो. जरी मेघ निर्जीव असला तरी यक्ष त्याला तसे समजत नाही. मेघाला बोलताच येत नाही, तर तो होकार-नकार तरी कसा देणार? तरीही यक्ष म्हणतो, तू जरी मौन राहिलास तरी तो मी तुझा ‘प्रत्यादेश’ म्हणजे नकार समजत नाही.

‘धूमज्योतिःसलिलमरुतां सन्निपातः’ असे कविने मेघाबद्दल प्रारंभीच सांगितले आहे. पर्जन्यचक्र कसे असते ते सांगितले आहे. तरीही यक्षाने त्याच्यापुढे एवढा ग्रंथ वाचला. तो ‘कामार्त’ आहे म्हणून त्याने मेघाला ही कामगिरी सांगितली. ती मेघाकडून पार पडायला हवी यासाठी मेघाला बोलते करणे कृत्रिम वाटले असते. म्हणून कालिदासाने मेघाकडून मूकसंमती घेऊन आपल्या ग्रंथाला विराम दिला आहे. पुढे यक्ष मेघाला प्रार्थना करून निरोप देतो…

एतत्कृत्वा प्रियमनुचितप्रार्थनावर्तिनो हे

सौर्हादाद्वा विधुर इति वा मय्यनुक्रोशबुद्ध्या।

इष्टान्देशाञ्जलद विचर प्रावृषा संभृतश्री-

र्माभूदेवं क्षणमपि च ते विद्युता विप्रयोगः।।

अर्थः- मित्रभावाने किंवा मी विरही म्हणून माझ्यावर अनुकंपा करण्याच्या बुद्धीने अनुचित कार्य करायला सांगणाऱया माझे हे इष्ट कार्य केल्यावर हे मेघा, वर्षाकालाने ऐश्वर्य वाढलेला असा तू इच्छित स्थळी गमन कर आणि माझ्याप्रमाणे तुझा विद्युल्लतेशी क्षणभरही वियोग न होवो!

 यक्ष स्वानुभवावरून पत्नीचा विरह किती व्याकूळ करणारा असतो, हे जाणतो. त्यामुळे तशाच प्रकारच्या इतरांच्या दुःखाचीही तो कल्पना करू शकतो. त्याच अनुभवातून तो मेघही आपल्यासारखाच समदुःखी आहे असे समजून आपण जर जास्त काळ त्याला थांबवून ठेवले, तर त्याची पत्नी म्हणजे विद्युल्लता (वीज) अशीच विरहाच्या दुःखात जळून जाईल. त्या दोघांचा वियोग होईल अशी कल्पना करतो.

इथेच महाकवी कालिदासाने रचलेले उत्तरमेघ आणि ‘मेघदूत’ नावाचे काव्य समाप्त झाले. पण ह्यापुढेही काही ठिकाणी (मध्येच कोणीतरी घुसडलेले) पाच प्रक्षिप्त श्लोक आढळतात. पण इतर श्लोकांशी त्यांची तुलना करता ते हिणकस वाटतात. त्यांची ह्या काव्यात आवश्यकताच वाटत नाही.

कालिदासाची नाटके व इतर काव्ये यांच्यापेक्षा मेघदूताची थोरवी विशेष आहे. कारण त्याचे इतर साहित्य कोणत्यातरी पुराणकथांवर वगैरे आधारित होते. पण मेघदूताच्या कथेला फक्त आणि फक्त कल्पनेचाच आधार आहे! त्याचा कल्पनाविलास केवळ मेघदूतातच पहावा असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही! कालिदासाय नमः।

Related Stories

नव्या शिक्षण धोरणातील केंद्रीकरणाची विकृती

Amit Kulkarni

एअर इंडिया-एअर एशिया यांच्या विलीनीकरणास मंजुरी

Patil_p

महागाईचे मळभ

Patil_p

तूंहे तयांसि होयीं शरण

Patil_p

शाळेची घंटा

Patil_p

कालिदासाचे मेघदूत… एक खंडकाव्य (19)

Patil_p
error: Content is protected !!