प्रतिनिधी /कुंकळ्ळी
वेरोडा, कुंकळ्ळी येथील श्री शांतादुर्गा वेर्डेकरीण संस्थानचा वार्षिक कालोत्सव तथा जत्रोत्सव बुधवार 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. श्री शांतादुर्गा वेर्डेकरीण संस्थान राष्ट्रीय महामार्गावरील पांजरखणी येथून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आणि श्री चंद्रेश्वर भूतनाथ मंदिर असलेल्या पर्वताच्या दक्षिणेकडील पायथ्याशी वसलेले आहे. हे मंदिर पुरातन मंदिरांपैकी एक असून नवसाला पावणारी देवी म्हणून श्री शांतादुर्गा वेर्डेकरीणची ख्याती आहे.
गोवा तसेच शेजारील राज्यांत असलेले देवीचे कुळावी, भाविक यांनी यानिमित्त मोठय़ा प्रमाणात उपस्थिती लावून श्रींचा कृपाशीर्वाद घेतला. वार्षिक कालोत्सवाचा प्रारंभ अष्टमीला 30 नोव्हेंबर रोजी होऊन त्यानिमित्त सकाळी गणेशपूजन, श्रींस महाभिषेक, नंतर महानैवेद्य, मंगळारती, रात्री पालखी मिरवणूक, नंतर ‘अष्टदिकपाल’ उत्सव रथातून वाद्यांच्या तालावर श्रींची भव्य मिरवणूक, गणेशवंदना कार्यक्रम आणि ‘काणी नव्या युगाची’ हा कोकणी नाटय़प्रयोग झाला.
1 डिसेंबर रोजी सकाळी अभिषेक व इतर धार्मिक विधी झाले, तर रात्री 9 वा. अंतर्नाद क्रिएशन निर्मित व यतीन तळावलीकर प्रस्तुत मराठी भक्ती व भावसंगीताचा कार्यक्रम ‘रंग स्वरांचे’ सादर करण्यात येऊन त्यानंतर श्रींची विजयरथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. 2 रोजी सकाळी अभिषेक, आरती, तर रात्री देणगी कुपनांचा निकाल व नंतर आरोही व आरोक्ष नवलेश देसाई यांच्या सौजन्याने ‘ऑर्केस्ट्रा ओम मेलोडीज’, जागर होऊन पहाटे श्रींची ‘ब्रह्मरथा’तून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर आरती व प्रसाद होऊन उत्सवाची सांगता झाली. 2 रोजी कार्यक्रमाच्या आधी श्रींस अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव पुकारण्यात आला. श्रींचा हा वार्षिक उत्सव यशस्वी करण्यासाठी नवीन समितीचे अध्यक्ष गौरीश फडते देसाई, सचिव राहुल देसाई, कोषाध्यक्ष प्रकाश देसाई व मुखत्यार दामोदर देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले.