पुणे / वार्ताहर :
हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत संघटित गुन्हेगारी करणाऱ्या कुख्यात कल्याणी देशपांडेसह (Kalyani Deshpande) आणखी एकाला विशेष न्यायाधीश ए. आर. नावंदर यांनी 7 वर्षे सक्तमजुरी आणि 10 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त 1 वर्षे कारावास भोगावा लागले असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
कल्याणी देशपांडे आणि प्रदिप गवळी अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कल्याणी देशपांडे ही पिटा आणि मोक्का गुन्हात शिक्षा झालेली राज्यातील पहिली महिला आरोपी आहे.
पुण्यातील कोथरूड भागातील एका सोसायटीमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविल्याप्रकरणी कल्याणी देशपांडे हिला ऑगस्ट 2016 मध्ये अटक करण्यात आली होती. शहरात संघटितपणे वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणी कल्याणी देशपांडेवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी कल्याणी देशपांडे हिच्यावर चतुःशृंगी, कोथरूड, विश्रांतवाडी, हिंजवडी आदी पोलीस ठाण्यात 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी काम पाहिले. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ऍड. फरगडे यांनी युक्तीवादादरम्यान केली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत शिक्षा सुनावली आहे.
अधिक वाचा : महाराष्ट्रात गारठा आणखी वाढणार