Tarun Bharat

गुजरातमध्ये ‘कमळ’च, हिमाचलमध्ये रस्सीखेच

एक्झिट पोलचा अंदाज ः गुजरातमध्ये भाजपला बहुमत मिळणार ः ‘आप’चा चंचूप्रवेश शक्य

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

गुजरात विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडल्यानंतर काही सर्वेक्षण संस्था आणि प्रसारमाध्यमांनी सोमवारी सायंकाळी मतदानोत्तर अंदाज (एक्झिट पोल) जाहीर केले. या अंदाजांनुसार गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपचे ‘कमळ’ फुलणार असून हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये सत्तास्थापनेसाठी रस्सीखेच होताना दिसत आहे. हिमाचलमध्ये दर पाच वर्षांनी सत्तांतराची परंपरा असली तरी काही सर्वेक्षण संस्थांनी येथे भाजप पुन्हा सत्तेत येण्याचे कल जाहीर केले आहेत. हे अंदाज कसेही असले तरी प्रत्यक्ष निकालांसाठी गुरुवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हिमाचल प्रदेशात एकाच टप्प्यात तर गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे आता या दोन्ही राज्यात सत्ता कुणाची येणार? यावर चर्चा सुरू झाली आहे. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले होते तर दुसऱया टप्प्याचे मतदान सोमवारी पार पडले. हिमाचलमध्येही नोव्हेंबरमध्येच मतदान पार पडले असले तरी मतमोजणी गुरुवार, 8 डिसेंबरला होणार आहे.

‘रिपब्लिक पी-मारक्यू’ यांनी गुजरातमधील सर्वेक्षणानंतर भाजपला 128 ते 148 जागा आणि काँग्रेसला 30 ते 42 जागा मिळू शकतात, असा दावा केला आहे. तसेच आम आदमी पक्षाला येथे केवळ दोन ते दहा जागा मिळण्याची शक्मयता वर्तवली आहे. तर अन्य पक्षांना तीन जागा मिळण्याचा अंदाज आहे. ‘न्यूज 18’ च्या एक्झिट पोलनुसार भाजपला 132 तर काँग्रेसला 38 जागा मिळू शकतात. याशिवाय 7 जागा ‘आप’च्या खात्यात आणि 05 जागा अन्य पक्षांना मिळण्याचा अंदाज आहे.

‘इंडिया न्यूज ऑन द स्पॉट’च्या एक्झिट पोलच्या निष्कर्षानुसार भाजप 117 ते 140 जागा जिंकू शकते. त्याचवेळी काँग्रेसला तेथे 34 ते 51 जागा मिळण्याची शक्यता आहे.ाख आम आदमी पक्षाला येथे 6 ते 13 जागा मिळू शकतात. अन्य पक्षांना केवळ 1 ते 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे. ‘टीव्ही-9 जन की बात’ने गुजरातमध्ये पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केला आहे. भाजपला 128 जागा मिळण्याची शक्मयता आहे. तसेच काँग्रेस 45 जागांपर्यंत पोहोचू शकते. तसेच पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आम आदमी पक्षाला केवळ तीन जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतरांच्या खात्यात 5 ते 7 जागा जिंकता येतील.

‘आप’ ठरणार तिसऱया क्रमांकाचा पक्ष

गेल्या 27 वर्षांपासून गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. राज्यात साधारणपणे भाजप आणि काँग्रेसमध्येच मुख्य लढत असते, मात्र यावेळी आम आदमी पक्षाने राज्यातील निवडणूक तिरंगी केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यात आक्रमक प्रचार केला होता. याचा परिणाम राज्यात दिसून येणार असला तरी ‘आप’ला मोठे यश मिळण्याचा अंदाज कुणीही व्यक्त केलेला नाही. येथे ‘आप’ तिसऱया क्रमांकावर राहणार असून भाजप आपले सत्तास्थान कायम ठेवणार आहे. 2017 मध्ये भारतीय जनता पक्षाने 99 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. 2012 च्या तुलनेत काँग्रेसला 16 जागा मिळाल्या होत्या.

हिमाचलचा सामना सर्वात मनोरंजक

सोमवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार हिमाचल प्रदेशची लढत सर्वात मनोरंजक असणार आहे. सहापैकी दोन सर्वेक्षणे वगळता सर्वच जण हिमाचलमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे सांगत आहेत. ‘टाईम्स नाऊ ईटीजी’ने भाजप सरकार स्थापनेचे भाकीत केले आहे, तर ‘आज तक ऍक्सिस माय इंडिया’च्या सर्वेक्षण निष्कर्षानुसार काँग्रेस सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे.

‘टाईम्स नाऊ’च्या अंदाजानुसार, भाजपला 38, काँग्रेसला 28, आम आदमी पक्षाला 0 आणि इतरांना 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे. ‘आज तक’च्या सर्वेक्षणानुसार, भाजपला 24 ते 34, काँग्रेसला 30-40 आणि इतर पक्षांना शून्य जागा दाखविण्यात आल्या आहेत. ‘इंडिया टीव्ही’ने भाजपला 35 ते 40, काँग्रेसला 26 ते 31 आणि इतरांना 0 ते 3 जागा मिळतील असे म्हटले आहे. ‘न्यूज 18’च्या सर्वेक्षणानुसार भाजप- 36, काँग्रेस – 30, आप – 0 आणि इतर पक्ष 2 जागा घेतील असा दावा केला आहे. ‘झी न्यूज’च्या सर्वेक्षणानुसार भाजपला 35-40, काँग्रेसला 20-25, आप पक्षाला 0-3 आणि इतर पक्षांना 1-5 जागा दाखविण्यात आल्या आहेत. ‘इंडिया न्यूज जन की बात’च्या सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्षाला 32-40 जागा मिळण्याची शक्मयता आहे. काँग्रेसला 27-34, आम आदमी पार्टीला 0 आणि इतरांना 1-2 जागा मिळण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. एकंदर हिमाचलसाठी आतापर्यंत आलेल्या सर्व सर्व्हेमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये निकराची लढत होणार हे निश्चित झाले आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये सध्या भाजपचे सरकार आहे. येथे राज्यात दर पाच वर्षांनी सरकार बदलत असते. हिमाचल विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत भाजपने 68 पैकी 44 जागा जिंकून बहुमताने सरकार स्थापन केले. काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. गुजरातप्रमाणेच हिमाचलमध्येही भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये तिरंगी लढत आहे.

Related Stories

पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्याचा मोदींना सलाम

Patil_p

शेतकऱ्यांच्या हितासाठी इथेनॉलला प्राथमिकता

Patil_p

शेतकरी-बाजारपेठ यांच्यातील दुवा

Patil_p

पुड्डुचेरीत भाजपचे घोषणापत्र सादर

Patil_p

प्रो लीग पुरूषांच्या हॉकी स्पर्धेत हॉलंड विजेता

Patil_p

देशात कोरोना लाट तीव्र ! गेल्या २४ तासांत चार हजारपेक्षा अधिक बळी

Archana Banage