मध्यप्रदेश शाखा अध्यक्षपदी जितू पटवारी, छत्तीसगडमध्ये विरोधी पक्षनेत्याची निवड
वृत्तसंस्था / भोपाळ
विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभव मध्यप्रदेशचे ज्येष्ठ काँग्रेसनेते कमलनाथ यांना भोवणारी हे जाणकारांचे भाकित खरे ठरले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कमलनाथ यांची शनिवारी मध्यप्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली असून हे पद आता जितू पटवारी यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड तत्काळ करण्यात येत आहे, असे काँग्रेसने स्पष्ट केले. कमलनाथ यांनी पक्षासाठी केलेले योगदान प्रशंसनीय आहे, असेही स्पष्ट करण्यात आले असून मध्यप्रदेश विधिमंडळ काँग्रेस नेतेपदी उमंग सिंघर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर हेमंत कटारे यांनी उपनेतेपदी निवड केल्याची घोषणा मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी केली.
मध्यप्रदेशप्रमाणे छत्तीसगड राज्यामध्ये मात्र, प्रदेशाध्यक्षांना हटविण्यात आलेले नाही. या पदी दीपक बैस यांनाच ठेवण्यात आले आहे. तर छत्तीसगड विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी चरणदास महंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेतेपद माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना दिले जाईल, अशी अटकळ होती. तथापि, ती चुकीची ठरली आहे. चरणदास महंत हे गेल्या विधानसभेत अध्यक्ष होते. आता काही दिवसांमध्ये नवे अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत.
भाजपचे घवघवीत यश
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन्ही राज्यांमध्ये घवघवीत यश मिळाले आहे. पक्षाने राजस्थानातील 199 पैकी 115, मध्यप्रदेशातील 230 पैकी 163 तर छत्तीसगडमध्ये 90 पैकी 54 स्थानांवर विजय मिळविला आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत ही तीन्ही राज्ये काँग्रेसने जिंकली होती.