ऑनलाईन टीम / मुंबई :
दाऊद इब्राहिमशी (dawood ibrahim) संबंधित युसूफ लकडावालाकडून खा. नवनीत राणा (navneet rana) यांनी 80 लाखाचे कर्ज घेतल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे. त्यासंदर्भात काही कागदपत्रेही राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून शेअर केली होती. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं असतानाच भाजप नेते मोहित कंबोज (mohit kamboj) यांनी एक धक्कादायक ट्विट केलं आहे.
मोहित कंबोज यांनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या युसूफ लकडावाला याच्यासोबतचा जुना फोटो शेअर केला आहे. त्याला “दाऊद इब्राहिमके सभी गुर्गे एक साथ?” असे कॅप्शन देत संजय राऊत यांना टॅग केले आहे.
त्यानंतर कंबोज यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि युसूफ लकडावालाचा फोटो शेअर केला आहे. त्याला कंबोज यांनी कॅप्शन दिले आहे की, “संजय राऊत यांचे या फोटोवर काय म्हणणे आहे, दाऊद इब्राहिमच्या हस्तकाचा आणि शरद पवार यांचा काय संबंध?”असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.