वृत्तसंस्था /वेलिंग्टन
आयसीसीच्या ताज्या कसोटी फलंदाजांच्या मानांकन यादीत न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियम्सनने आघाडीच्या स्थानाकडे आपला प्रवास सुरू ठेवला आहे. अलीकडेच लंकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात विलियम्सनने दमदार द्विशतक झळकविले होते. आता तो या मानांकन यादीत दुसऱया स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा लाबुसेन पहिल्या स्थानावर असून आता या दोघांमध्ये आघाडीच्या स्थानासाठी चुरस निर्माण झाली आहे. केन विलियम्सनने यापूर्वी आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या मानांकन यादीत आघाडीचे स्थान मिळविले होते. लंकेविरुद्ध झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने लंकेचा 2-0 असा एकतर्फी पराभव केला. विलियम्सनने यापूर्वी या मानांकनात सहावे स्थान घेतले होते. पण त्यानंतर वेलिंग्टनच्या कसोटीत त्याने द्विशतक झळकविल्याने त्याचे मानांकनातील स्थान चार अंकांनी वधारले. ऑस्ट्रेलियाचा लाबुसेन या मानांकन यादीत पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंडतर्फे नाबाद द्विशतक झळकविणाऱया निकोल्सने कसोटी फलंदाजांच्या मानांकन यादीत 27 व्या स्थानावर झेप घेतली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार टिम साउदीने 11 वे, तर मॅट हेन्रीने 31 वे स्थान कसोटी गोलंदाजांच्या मानांकन यादीत मिळविले आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया, बांगलादेश-आयर्लंड, दक्षिण आफ्रिका-विंडीज तसेच झिम्बाब्वे-नेदरलँड्स यांच्यातील वनडे मालिकेतील खेळाडूंच्या कामगिरीनंतर आयसीसीच्या वनडे मानांकन यादी जाहीर करण्यात आली. या यादीत गोलंदाजांच्या विभागात भारताच्या मोहम्मद सिराजने तिसरे स्थान मिळविले. ऑस्ट्रेलियाचा हॅझलवूड पहिल्या स्थानावर असून न्यूझीलंडचा बोल्ट दुसऱया स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने भारताविरुद्धच्या दोन सामन्यात 8 गडी बाद केल्याने त्याने या मानांकनात संयुक्त तिसरे स्थान मोहम्मद सिराजसमवेत मिळविले आहे. भारताचा मोहम्मद शमी 28 व्या स्थानावर आहे. वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत दक्षिण आफ्रिकेचा डिकॉक, भारताचा शुभमन गिल आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ यांनी शानदार कामगिरी केली आहे. या तिन्ही खेळाडूंनी पहिल्या दहा फलंदाजांत स्थान मिळविले आहे. विंडीजचा कर्णधार शाय हॉप याने या मानांकन यादीत 12 वे तर बांगलादेशच्या मुशफिकर रहीमने 18 वे स्थान मिळवले आहे.