स्वीपचा सराव टाळला, मिचेल स्टार्क, कॅमेरॉन ग्रीन तिसऱया कसोटीत खेळणार
वृत्तसंस्था/ इंदोर
फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनचे येथील होळकर स्टेडियमवरील रेकॉर्ड विचारात घेऊन ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी धोकादायक ठरलेल्या स्वीप शॉटचा नाद सोडून देत सरावावेळी पारंपरिक पद्धतीने स्पिन खेळण्यावर भर देताना सोमवारी दिसून आले.
पहिल्या दोन कसोटीत अश्विन व जडेजा यांच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पूर्णपणे लोटांगण घातल्याने तीन दिवसातच सामने संपले आणि भारताने 2-0 अशी आघाडी घेतली. दुसऱया कसोटीत तर त्यांचे बरेच फलंदाज स्वीप शॉट खेळताना बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाच्या अनेक माजी खेळाडूंनी त्यांच्यावर टीका केली. अश्विनने होळकर स्टेडियमवर झालेल्या याआधीच्या दोन कसोटीत 12.5 धावांच्या सरासरीने तब्बल 18 बळी मिळविले आहेत. दिल्लीतील दुसऱया कसोटीनंतर ऑस्ट्रेलियन संघ आठवडय़ानंतर येथे दाखल झाला असून नियोजित वेळेच्या आधीच त्यांनी सरावालाही सुरुवात केली आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मिळविण्याची संधी गमविल्यानंतर झालेल्या चुकांतून बोध घेत त्यांनी तीन तासाहून अधिक काळ सराव केला.
यावेळी स्वीप शॉटचा सराव करण्याऐवजी स्मिथ आणि कंपनीने स्पिनर्सविरुद्ध फॉरवर्ड डिफेन्स खेळणे आणि पुढे सरसावत येत फटके मारण्याच्या सरावावर जास्त भर दिला. स्मिथ व उस्मान ख्वाजा सर्वप्रथम नेट सरावासाठी दाखल झाले आणि नाथन लियॉन व मॅथ्यू कुहनमन यांच्या फिरकीवर त्यांनी सुमारे तासभर फलंदाजी केली. फिरकीविरुद्ध सर्वात चांगले प्रदर्शन करणाऱया स्मिथकडून पहिल्या दोन कसोटीत अपेक्षित कामगिरी झाली नाही. त्याची भरपाई बुधवारपासून सुरू होणाऱया तिसऱया कसोटीत करण्यास तो उत्सुक झाला आहे. लियॉनने स्मिथ व ख्वाजा यांना बराच त्रास दिला. पण दोघानीही डिफेन्स भक्कम करण्याचा निर्धार दाखविला. त्यांनी हवेतून फटके कुहनमनच्या गोलंदाजीवर मारले. भारतीय खेळपट्टय़ावर स्वीपचा फटका धोकादायक असून त्यावर फारशा धावाही निघत नाहीत, हे माहीत असूनही दिल्ली कसोटीत त्याचा सढळ वापर करीत त्यांनी पराभव ओढवून घेतला होता. अश्विन आणि कंपनीला अस्थिर करण्यासाठी त्यांना डिफेन्स मजबूत करून पुढे येऊन खेळण्यावर अधिक भर द्यावा लागणार आहे.
सर्वानी फलंदाजी केल्यानंतर स्मिथ व ख्वाजा पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आले. ख्वाजाशिवाय फक्त ऍलेक्स कॅरेनेच स्वीपचा सराव केला. कॅरे चार वेळा स्वीप खेळताना बाद झाला आहे. लाबुशेन, ट्रव्हिस हेड, पीटर हँडस्कॉम्ब यांनी ऑफस्पिनर मर्फी व लेगस्पिनर मिचेल स्वेप्सन यांची गोलंदाजी खेळली. या मालिकेत हँडस्कॉम्बने स्पिनरविरुद्ध चांगली फलंदाजी केली. पण सरावावेळी त्याने स्वेप्सन व मर्फीला पुढे सरसावत फटके मारण्याचा अधिक सराव केला.
पूर्ण फिट झालेला स्टार्क तिसऱया कसोटीत खेळणार
डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क बोटाच्या दुखापतीतून पूर्ण बरा झाला असून तिसऱया कसोटीत तो कमिन्सच्या जागी संघात असेल. कमिन्सची आई आजारी असल्याने या कसोटीसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही. ‘आपण शंभर टक्के तंदुरुस्त नाही. मात्र ग्रीनला जवळपास तासभर मी गोलंदाजी केली, तेही व्यवस्थित वेग राखत,’ असे स्टार्कने सांगितले. ग्रीनही आता पूर्ण फिट झाला असून तोही या कसोटीत खेळताना दिसेल. बोटाच्या दुखापतीमुळे त्याला पहिल्या दोन कसोटी हुकल्या होत्या. कमिन्स वॉर्नर संघात नसल्याने ग्रीन व स्टार्क यांना संधी मिळणार हे निश्चित झाले आहे.