कृषिमंत्री रवी नाईक यांनी काणकोण मतदारसंघ भेटीत व्यक्त केलेला विश्वास
प्रतिनिधी /काणकोण
कृषिमंत्रिपदाचा ताबा घेतल्यानंतर रवी नाईक यांनी शुक्रवारी पहिल्यांदाच काणकोण मतदारसंघाला भेट देताना शेळेर येथील नियोजित कृषी भवन प्रकल्पाच्या जागेची पाहणी करून एकंदर अहवाल समजून घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नाईक यांनी गोव्यातील पारंपरिक शेतकऱयांचे हित सांभाळतानाच सरकारच्या नवीन योजनांचा लाभ स्थानिक शेतकऱयांना मिळवून देण्याकडे आपले लक्ष असेल, असे स्पष्ट केले. काणकोणचे कृषी भवन नियोजित वेळेतच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना काणकोणचे कृषी भवन म्हणजे आपले स्वप्न असून या मतदारसंघातील शेतकऱयांसाठी ते एक मार्गदर्शक केंद्र ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. कृषी संचालक नेविल आफोंसो यांनी शेतकऱयांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी करून दिली. काणकोणचे विभागीय कृषी अधिकारी कीर्तिराज ना. गावकर, नागेश कोमरपंत, भाजपाच्या मंडळ समितीचे अध्यक्ष विशाल देसाई, दिवाकर पागी, मंडळाचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर कृषिमंत्री नाईक यांनी खालवडे, नुवे, वैजावाडा येथील कृषी प्रकल्प त्याचप्रमाणे आमोणे येथील बलराम निवासी शाळेला भेट देऊन पाहणी केली आणि एकंदर कामाबद्दल समाधान व्यक्त केले.