भटकळ नगरपरिषद इमारतीवरील फलक वादाच्या भोवऱयात : त्वरित न हटविल्यास आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी /कारवार
भटकळ येथील नगरपरिषदेच्या इमारतीवर लावण्यात आलेला उर्दू भाषेतील फलक वादाच्या भोवऱयात सापडला आहे. उर्दू भाषेतील फलकाला कन्नडपर संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. सदर फलक एक दिवसाच्या आत हटविण्यात आला नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा कन्नडपर आणि हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. यामुळे भटकळ नगरातील वातावरण ढवळून निघाले आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी, भटकळ येथील नगरपरिषदेची नवीन इमारत दहा-बारा वर्षापूर्वी बांधण्यात आली आहे. तथापी या इमारतीवर टाऊन म्युन्सीपल कौन्सिल, भटकळ असा फलक कन्नड आणि इंग्रजीमध्ये लावण्यात आला होता. त्यामुळे त्या फलकाबद्दल कुणाचा आक्षेप आणि तक्रार नव्हती. तथापी आता इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली आहे. रंगरंगोटीनंतर इमारतीवर कन्नड आणि इंग्रजीच्या बरोबरीने उर्दू भाषेतही टाऊन म्युन्सीपल कौन्सिल असा फलक लावण्यात आला आहे. ही बाब लक्षात येताच भुवनेश्वरी कन्नड संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी म्युन्सीपल इमारतीकडे धाव घेतली आणि फलक उर्दू भाषेत लिहिल्याबद्दल आक्षेप नोंदविला आणि सदर उर्दू फलक एक दिवसाच्या आत हटविण्याची जोरदार मागणी केली. यावेळी घटनास्थळी कन्नडप्रेमी मोठय़ा संख्येने जमा झाले आणि त्यांनी कौन्सिलच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
याप्रसंगी बोलताना श्रीकांत नाईक म्हणाले, नियमानुसार फलक कन्नड भाषेत लिहिण्यात आला होता. बाहेरुन भटकळमध्ये दाखल होणाऱयाना व ज्यांना कन्नड भाषा कळत नाही अशा नागरिकांसाठी इंग्रजीमध्ये फलक लिहिला होता. भटकळवासियांना कन्नड लिहिता वाचता येते. तरीसुद्धा उर्दू भाषेत फलक का लिहिण्यात आला? यामागील गौडबंगाल समजायला मार्ग नाही. उर्दूप्रेमींनी खासगी ठिकाणी उर्दू भाषा वापरायला कुणाचा आक्षेप नाही. तथापी म्युन्सीपल कौन्सिलचा उर्दू भाषेत असणे कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही.
उर्दू भाषिकही घटनास्थळी दाखल
दरम्यान उर्दू भाषिकही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी फलक उर्दू भाषेत लिहिला गेला तर काय हानी होणार आहे? असा प्रश्न केला. यावेळी उर्दू भाषिक आणि कन्नड भाषिकांदरम्यान शाब्दिक चकमकी झाल्या. भटकळ टी. एम. सी.चे अध्यक्ष परवेज काशीमजी याप्रसंगी बोलताना म्हणाले,नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीवर कन्नड, इंग्रजी आणि उर्दू भाषेमध्ये फलक लिहिण्यात आला होता. जुन्या इमारतीवरील फलकाची पुनरावृत्ती नवीन इमारतीवर करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचे नवीन बदल आम्ही केलेले नाहीत.
उर्दू भाषिकांकडून निदर्शने
दरम्यान, नगरपरिषदेच्या इमारतीवरील उर्दू ओळी हटवू नये या मागणीसाठी मंगळवारी उर्दू भाषिकांनी जोरदार निदर्शने केली आणि नगरपरिषदेच्या इमारतीला घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न
कन्नडपर संघटना कन्नडिगांचे नाव बदनाम करीत आहे. फलकावर कन्नड भाषेला प्राधान्यता देण्यात आली आहे. उर्दू हीसुद्धा प्राचीन भाषा आहे. भटकळमधील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न कन्नडपर संघटना करीत आहेत, असा आरोप उर्दू भाषिकांनी यावेळी केला. जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा परिस्थितीवर बारीक नजर ठेऊन आहे.